भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सुभेदारवस्ती भागात दोन गट समोरासमोर आल्याने किरकोळ दगडफेक झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. पोलिसांनी गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंदवून दोघा संशयितांची चौकशी केली. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे, खा. दिलीप गांधी, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. राम शिंदे, आ. अनिल राठोड, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह जिल्ह्य़ातील अनेक नेत्यांनी चित्ते यांची भेट घेवून चौकशी केली.
चित्ते हे काल रात्री साडे नऊ वाजता मोटारसायकलवर बाळासाहेब आहिरे यांच्यासह घरी जात असताना तिघा अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या वेळी त्यांच्यासोबत दुस-या मोटारसायकलवर संरक्षणासाठी दिलेला पोलिस कर्मचारी विशाल पंडोरे होते. चित्ते सुदैवाने बचावले. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या पिस्तुलाच्या दोन गोळ्या पोलिसांना मिळाल्या. घटनेनंतर रात्री मोठा जमाव पोलिस ठाण्यात जमला होता. पोलिसांनी चित्ते यांची फ़िर्याद घेऊन गुन्हा नोंदविला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके -ठाकरे यांनी दोन दिवसांत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव रात्री अडीच वाजता पोलीस ठाण्यातून निघून गेला.
हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी निषेध सभा घेण्यात आली. काही तरुण दुकाने बंद करण्यासाठी सय्यद बाबा चौकाकडे निघाले. त्या वेळी दोन्ही बाजूचा जमाव जमला. दगडफेकीचे प्रकार घडले. सेनेचे राजेंद्र देवकर यांना या वेळी दगड लागला. सौम्य लाठीमार तसेच बळाचा वापर करून पोलिसांनी जमाव पांगवला. सेना, भाजप तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. आज दिवसभर शहरात तणावाचे वातावरण होते. चित्ते यांच्या घराला पोलिस बंदोबस्त देण्यात आले. अनेकांनी चित्ते यांची भेट घेऊन विचारपूस केली. हल्ल्याच्या आधी आठ दिवसांपूर्वी चित्ते यांनी पोलिस अधिका-यांची भेट घेऊन बाहेरचे गुन्हेगार हल्ल्यासाठी आले असल्याची तक्रार केली होती.
भाजपचे अभय आगरकर, राजेंद्र पिपाडा, मनसेचे वसंत लोढा, जिल्हाध्यक्ष सचिन डफ़ळ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे, सचिन पारखे, जालिंदर वाकचौरे, बाबा दिघे, शरद नवले, माजी आमदार ज.य.टेकावडे आदींनी चित्ते यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ़डणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी चित्ते तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक साळुंके-ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. चित्ते यांना संरक्षण देण्यात आले असून गुन्हेगारांचा शोध लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राठोड यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला जाईल असे स्पष्ट केले.
चित्ते यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निषेध केला. काँग्रेसचे नगरसेवक संजय छल्लारे, राजेंद्र सोनवणे, अंजुम शेख, महंमद शेख, मुन्ना पठाण, अशोक उपाध्ये, भरत कुंकूलोळ, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, राष्ट्रवादीचे भाऊ डाकले, लकी सेठी, यांच्यासह अनेकांनी बंदचे अवाहन केले होते.
 पोलिसावर कारवाई होणार
चित्ते यांना फेब्रुवारी महिन्यात पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष फ़डणवीस यांनी दिलेल्या सूचनेनंतर पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी संरक्षण दिले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक साळुंके-ठाकरे यांनी सुरक्षेची काळजी कशी घ्यावयाची याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. चित्ते यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून संरक्षणासाठी नेमलेले पोलिस कर्मचारी पंडोरे यांनी गोळीबार करायला हवा होता. तो केला नाही म्हणून पंडोरे यांची चौकशी करून