एलबीटीच्या विरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी १० मे पासून व्यवहार बंद ठेवण्याचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे ऐन लग्नसराईत खरेदीची पंचाईत होणार असल्याने भर उन्हात शहरातील व्यापार पेठांमध्ये खरेदी होताना दिसत आहे. तर बंदचे नियोजन कसे असावे याबाबत चर्चा करण्यासाठी सांगली येथे बुधवारी रात्री कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.     
एलबीटीला राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. आंदोलन राज्यव्यापी करण्याच्या हालचाली व्यापारीवर्गातून सुरू आहेत. याअंतर्गत कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे ठरविले आहे. १० मे पासून शहरातील दुकाने बंद राहणार आहेत. औषधे व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारच्या विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
 पुणे येथे झालेल्या बैठकीवेळी कोल्हापूर व्यापारी महासंघाने या आंदोलनाबाबत तीन पर्याय सुचविले होते. व्हॅटमध्ये अर्धा टक्के वाढ, राज्यव्यापी बंद, रक्तदान शिबिर या प्रस्तावाला येथे मान्यता देण्यात आली. तोच राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असणार आहे. १० मे पासून कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी संघटितपणे आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील व्यापाऱ्यांना शासनाकडून दडपशाही केली जात आहे. व्यापाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरू झाले आहे. या पाश्र्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत राहून कोल्हापुरात आंदोलन केले जाणार आहे, असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. विशेषत: ११ व १२ मे रोजी विवाहाचे मुहूर्त अधिक प्रमाणात आहेत. त्याच्या खरेदीवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेतली आहे. लग्नादिवशी दुकाने बंद राहणार हे गृहीत धरून आवश्यक ती खरेदी केली जात आहे. सोन्या-चांदीचे दागिने, कपडे, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य अशा प्रकारच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी शहरातील व्यापारी पेठांमध्ये भर उन्हामध्ये खरेदीचे सत्र सुरू होते.