इचलकरंजी येथील सायझिंग कामगारांचा संप मुंबई येथे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर मागे घेतल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. मात्र कामगारांना कोणते लाभ मिळणार यावरून कामगार नेते व सायझिंग चालक यांच्यात मतभेद दिसून येत आहेत.
कामगारांना कायद्याप्रमाणे प्रॉ.फंड, शंभर टक्के विशेष भत्ता व किमान वेतनाची पूनर्रचना करून येत्या सहा महिन्यात त्याचा लाभ देण्याचे लेखी आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. तर सायझिंग चालक मात्र कामगारांना कसलीही वाढ दिली असल्याचा इन्कार करीत आहेत. त्यामुळे सायझिंग कामगार आंदोलनाची नेमकी फलश्रुती काय याबाबत वस्त्रनगरीत संभ्रमावस्था आहे. या बैठकीसाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मध्यस्थी केली.
कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कामगार खात्याचे प्रधान सचिव अरविंद कुमार, कामगार आयुक्त मधुकर गायकवाड, उपायुक्त आर.आर.हेंद्रे, सहाय्यक कामगार आयुक्त बी.डी.गुजर, आमदार हाळवणकर, कामगार नेते प्राचार्य कॉ.ए.बी.पाटील, भरमा कांबळे, सुभाष निकम, मारूती जाधव, सायझिंग चालक प्रतिनिधी बंडोपंत लाड, बाबुराव पाटील, संतोष कोळी उर्फ बाळ महाराज, प्रकाश गौड, अनिल मगदूम, प्रमोद म्हेतर, संजय खोत, दिलीप ढोकळे आदी उपस्थित होते.
सायझिंग चालक प्रतिनिधींनी संयुक्त बैठकीस नकार दिल्याने मुश्रीफ यांना कामगार व मालक यांच्या समवेत चर्चेच्या दोन फेऱ्या घ्याव्या लागल्या. कामगारांना समाधानकारक वाढ दिली असल्याने पुन्हा वाढ देण्यास सायझिंग चालकांनी इन्कार दर्शविला. तर कामगार प्रतिनिधींनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. शहरातील औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी तडजोड करण्याचे आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले. त्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मंत्री मुश्रीफ यांनी वरीलप्रमाणे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर प्राचार्य पाटील यांनी संप मागे घेणार असल्याची घोषणा केली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
सायझिंग कामगारांचा संप मागे
इचलकरंजी येथील सायझिंग कामगारांचा संप मुंबई येथे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर मागे घेतल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली

First published on: 17-07-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike withdraw of sizing worker