शहरालगतच्या निसर्गरम्य परिसरात बरसणाऱ्या सरींच्या साक्षीने खुल्या निसर्गास रेखाटण्याच्या उपक्रमात बालकांसह त्यांचे पालकही सहभागी झाले. निसर्गास कागदावर उतरविण्याचा हा उपक्रम पालकांच्या कलेची पारख करणारा ठरत आहे. वर्गात चित्र रेखाटणारी मुले आपल्या बोटांची जादू जागा मिळेल तेथे उमटविण्याचा प्रयत्न करतातच. म्हणूनच चित्रकलेच्या वहीखेरीज अन्य वह्य़ाही रंगाने माखल्याचे, तसेच घरातील भिंतीही सुशोभित झाल्याचे चित्र परिचित आहे.
ही उपजत आवड हेरून राणीबाई अग्निहोत्री चित्रकला महाविद्यालयाने निसर्ग रेखाटन उपक्रम हाती घेतला. यात महाविद्यालयीन विद्यार्थी आहेतच, पण त्यांचे पालक, हौशी चित्रकार, गृहिणीही सहभागी होत आहेत. शहरालगत हनुमान टेकडी, गोपुरी, बौध्द स्तुप परिसर, पवनार आश्रम, वैद्यकीय महाविद्यालय, गांधी विद्यापीठ व अन्य परिसर सरीवर सरी पडल्याने हिरव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. या हिरव्या रंगास विविधरंगी फु ले, इंद्रधनुष्य, अभ्राच्छादित आभाळ यांच्याही रंगाच्या नाना छटा मिसळल्याने वातावरण उल्हसित झाले आहे. निसर्गचित्र रेखाटन उपक्रमात या सर्व छटा टिपला जात आहे.
हा एक स्वच्छंदी उपक्रम असून चित्रकला महाविद्यालयाच्या चमूसह कुणीही यात सहभागी होऊ शकतो. नि:शुल्क असा हा उपक्रम असून पालकांच्या कुंचल्यासही बहार आली आहे, असे मत उपक्रमाचे प्रेरक शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. या उपक्रमात ऐतिहासिक वास्तूंसाठी विशेष विभाग असून महात्माजींचा पदस्पर्श लाभलेल्या वास्तूंचे चित्र काढतांनाच तत्कालिन इतिहास जागविण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात आहे. रविवारच्या पहिल्याच टप्प्यात शेकडो चित्रप्रेमी यात सहभागी झाले होते. कलात्मकतेला सृजनशिलतेची जोड मिळाल्यास हौस पूर्ण करतांनाच प्रसंगी रोजगाराची संधीही उपलब्ध करून देणारा हा उपक्रम असल्याचे मत प्राचार्य रिझवान खान व प्रा.प्रफु ल्ल दाते यांनी व्यक्त केले. या उपक्रमात उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्यांसाठी कला प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे. यात पालकांनाही सहभागी होता येईल. या महिन्यात चार टप्प्यात हा उपक्रम चालणार आहे. वयाचे बंधन नसल्याने विद्यार्थी व पालक दोघेही या उपक्रमाचा आनंद लुटत असल्याचे दिसून आले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
बालकांसह पालकांनीही रेखाटला सरींच्या साक्षीने निसर्ग
शहरालगतच्या निसर्गरम्य परिसरात बरसणाऱ्या सरींच्या साक्षीने खुल्या निसर्गास रेखाटण्याच्या उपक्रमात बालकांसह त्यांचे पालकही सहभागी झाले. निसर्गास कागदावर उतरविण्याचा हा उपक्रम पालकांच्या कलेची पारख करणारा ठरत आहे.
First published on: 09-08-2013 at 09:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students and parents also take the part in painting