विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना स्वत:मधील कौशल्य ओळखावे, दुसऱ्याची नक्कल करून जगण्यापेक्षा स्वत:च्या नावासोबत मोठे होण्याचा विश्वास बाळगावा तसेच ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी त्यात झोकून देण्याची क्षमता स्वत:मध्ये आणावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव व चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी केले.
स्टडी सर्कल केंद्रात आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी आरटीपीएसमधील पोलीस निरीक्षक वैशाली शिंदे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी सचिव सुनील पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. स्टडी सर्कल केंद्राचे समन्वयक सुनील कुदळे यांनी शेखर गायकवाड यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. वैशाली शिंदे व सुनील पाटील यांचेही स्वागत करण्यात आले. स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांसोबत शेखर गायकवाड यांनी संवाद साधला.