लोकसभा निवडणुकांदरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामान्य नागरिकांनी मतदानासाठी उतरावे यासाठी जागृती अभियान हाती घेतले होते. मात्र, सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे हे अभियान विधानसभा निवडणुकांदरम्यान थंडावल्याचे चित्र आहे.
शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात जाऊन मतदान जागृती अभियान हाती घेतले होते. यामध्ये पथनाटय़े, जागृती फेरी आदींचा समावेश होता. याचबरोर परिसरातील ज्यांची नावे मतदार यादीत नाही अशांची माहिती घेऊन ती निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहचविण्याची कामे विद्यार्थी करीत होते. लोकसभा निवडणुकांदरम्यान दिवसाला दोन ते तीन ठिकाणी पथनाटय़ करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मात्र वेळच मिळत नाही. अभियान करण्याची मनापासून इच्छा आहे परंतु परीक्षा असल्यामुळे अभियानासाठी वेळ देता येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यातूनही सलग दोन-तीन दिवस जोडून सुट्टी आली की विद्यार्थी आपापल्या वेळेनुसार शहरातील विविध भागांत जाऊन जागृती अभियान करत आहेत. लोकसभा निवडणुकांदरम्यान करण्यात आलेल्या अभियानामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती तर झाली यामुळे मतदानाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना वाटत आहे.
हाच प्रयत्न विधानसभा निवडणुकांदरम्यान करावयाचा आहे. विद्यापीठाने काही परीक्षा दिवाळीनंतर ठेवल्या असल्या तरी महाविद्यालयीन परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभियानासाठी विशेष वेळ काढता येणे शक्य होत नाही.
लोकसभा निवडणुकांदरम्यान विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मतदान जागृती अभियान केले होते. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. मात्र, सध्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू असल्यामुळे अभियानासाठी फार वेळे देता येणे शक्य होत नाही. तरीही विद्यार्थी वेळ मिळेल तसे जागृती अभियान करत आहेत. यापूर्वी त्यांनी मतदार नोंदणी मोहीमही हाती घेतली होती. यातून महाविद्यालयांतील अठरा वष्रे वय पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करण्याचे काम झाले. निवडणूक आयोगाला मदत करण्यासाठी शहरातील बहुतांश महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांची नेमणूक केली असून ते आयोग आणि मतदार यांच्यात दूत म्हणून काम करत आहेत.  
    – प्रा. अविनाश कारंडे,
    एम. डी. महाविद्यालय