जिल्हा ग्रंथालय संघ संचालित शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्गाच्या ४९व्या विद्यार्थी गुणगौरव व निरोप समारंभात मान्यवरांना पारितोषिकांनी गौरविले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रंथालय परिषदेचे संचालक संजय पाटील हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे औरंगाबाद विभागाचे साहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी राज्याच्या ग्रंथालय खात्यात आपल्या सारखेच नाशिकचे इतर अनेक ग्रंथपालन विद्यार्थी ग्रंथालय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचा उल्लेख केला. संजय पाटील यांनी नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्याचा व जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचा गौरव केला. परीक्षाधिकारी मीनल टेंबे यांनीही मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गेल्या वर्षी शासकीय ग्रंथपालन परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला नाशिक केंद्राचा विद्यार्थी प्रदीप पाटील व राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी अंजली कोहोक, नाशिक केंद्रात विविध विषयांत गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी मृणालिनी नागपुरे, दीपिका जोशी, अरुणा अहिरराव, निशा सोनवणे यांचा रोख रकमेचा पुरस्कार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. समारंभाचे नियोजन व्यवस्थापक दत्ता पगार यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन वर्गाचे प्राचार्य प्रा. रामदास खैरनार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संघाचे अध्यक्ष रामचंद्र काकड व विभाग सघाचे प्रमुख कार्यवाह प्रा. एन. जे. पाटील यांनी करून दिला. आभार संघाचे उपाध्यक्ष केशवराव कोतवाल यांनी मानले.