येथे उद्या (रविवारी) होत असलेल्या राज्यातील पहिल्या सून संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत विद्या बाळ यांच्या हस्ते, तर समारोप ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने संमेलनाचे आयोजन केले आहे. राज्यातील काही सजग सुनांचा सत्कार या वेळी करण्यात येणार आहे.
तापडिया नाटय़ मंदिरात सकाळी ११ वाजता सून संमेलनाचे उद्घाटन होईल. सजग समितीने या पूर्वी गेल्या २४ जून रोजी राज्यातील पहिले सासू संमेलन घेतले होते. या संमेलनात सहभागी सासूंकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात जे मुद्दे पुढे आले त्यावर आधारित पुस्तिका उद्या होणाऱ्या संमेलनात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्त्री-पुरुष समानता या तत्त्वाने कुटुंब टिकले पाहिजे, कुटुंबात सर्वाना समानता हवी, कोणी श्रेष्ठ-कोणी कनिष्ठ नसावे, सहविचार असावा, निर्णय प्रक्रियेत समान सहभाग असावा, कोणीच कोणावर अन्याय करू नये, सासू-सुनेच्या संबंधांवर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून असते. या नात्यातील गुंतागुंत समजावून घेणे, त्यावर मात कशी करता येईल, या व अशा अनेक बाबींवर या संमेलनात चर्चा-मनोगत व्यक्त केले जाणार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी चंदाताई जरीवाला, ताराबाई लड्डा, प्राचार्य मनोरमा शर्मा, मेजर अनुराधा कांबळे, डॉ. मेबल फर्नाडिस, चंद्रभागाबाई दाणे, डॉ. सविता पानट यांच्या संयोजन समितीने संमेलनाची तयारी केली आहे.