संगीत क्षेत्रात सलग १०५ तास विक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नवीन काही तरी वेगळे करण्याचा संकल्प करून पुन्हा एकदा सुनील वाघमारे यांनी सलग ५१ तास विविध संताचे ग्रंथ वाचन सुरू केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत ३१ तास झाले. ३१ तासानंतर आवाजात कुठलाही थकवा न जाणवता त्याच उत्साहाने वाघमारे यांची ५१ तास विविध ग्रंथाचे वाचन करण्याकडे वाटचाल सुरू आहे.
मंगळवारी सकाळी सलग ५१ तास विविध संतांचे चरित्र कथन करण्याच्या विक्रमासाठी त्यांनी अष्टविनायक कथेने संकल्पाची सुरुवात केली आहे.  मैत्री परिवार आणि एनआरएस मोटीवेटर्स यांच्या सहकार्यातून नव्या संकल्पाची सुरुवात गीतामंदिरात झाली. त्यावेळी गीता मंदिराचे संचालक स्वामी निर्मलानंद महाराज, मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, डॉ. पिनाक दंदे, उमेश चौबे, डॉ. शरद सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. संत चरित्र कथन संकल्पामध्ये श्रीमद्भगवद गीता, हनुमान चालिसा, अनसूया माता, संत गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अन्य संत महात्म्यांच्या चरित्र ग्रंथाचा समावेश आहे. बुधवारी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, महापौर अनिल सोले यांनी भेट देऊन सुनीलच्या उपक्रमाचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या. एखाद्या ग्रंथाचे सलग बसून वाचन करणे खरे तर  कठीण असताना सुनील मात्र सातत्य ठेवून ग्रंथाचे वाचन करीत आहे. रात्रभर त्याने रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम गाथा आदी ग्रंथाचे वाचन केले. प्रत्येक तासानंतर पाच मिनिटांची विश्रांती घेऊन वाचनाला सुरूवात करतो.  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या डॉ. सुनीता क्षीरसागर धोटे त्यांचा विक्रम नोंदविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. डॉ. पिनाक दंदे आणि त्यांचे तज्ज्ञ डॉक्टर सहकारी सुनील वाघमारे यांच्याकडे लक्ष देत आहेत. आनंद सबाने, कुलभूषण डहाळे, संजय नखाते, अरविंद गिरी, महेंद्र कटारिया, सुनीता धोटे, गुलाबचंद जांगिड आदींची प्रमुख्याने उपस्थिती होते.
सलग ५१ तास संतकथन करण्याचा सुनील वाघमारे यांचा विक्रम आतापर्यंत एक आगळावेगळा ठरणार आहे. या त्यांच्या कथनामुळे संतांचे चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. या प्रकारचे कथन करण्याची त्यांची संकल्पना ही कौतुकास्पद बाब आहे. हा त्यांचा विक्रम राष्ट्रीय चारित्र्य सुदृढ करण्यास पूरक ठरेल, अशी आशा उमेश चौबे यांनी व्यक्त केली.