आशिया खंडातील पहिले ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळखले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. सर्वसामान्य रुग्णांची येथे गैरसोय होत आहे. कोटय़वधीची मशिनरी धूळखात पडून आहे. दरम्यान, या रुग्णालयास पूर्वपदावर आणण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे विश्वस्त अ‍ॅड. अजित देशमुख यांनी दिला.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील गैरसोयींबाबत अधिष्ठाता डॉ. नरेशकुमार ढानीवाला यांना अ‍ॅड. अजित देशमुख यांनी निवेदन सादर केले. रुग्णालयातील कोबाल्ट युनिट गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्याच्या दुरुस्तीस कोटय़वधीचा खर्च येत आहे. सीटी स्कॅन मशिनही बंद आहे. सरकारचा खर्च वाया जात आहे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात पात्र डॉक्टर, प्राध्यापकांची कमतरता असून, विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.