गेल्या पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेतलेल्या स्वाइन फ्लूचा प्रभाव या वर्षी अधिक वाढला असून त्यामुळे जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यांत शहरात ४८ मृत्यू झाले आहेत. गेली तीन वर्षे प्रभाव कमी झालेल्या स्वाइन फ्लूच्या साथीने या वर्षांत पुन्हा डोके वर काढल्याने या आजाराकडे अधिक गांभीर्याने पाहत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वाइन फ्लूची साथ आल्यानंतर २००९ मध्ये हाहाकार उडाला होता. त्या वेळी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले गेले. थंड आणि कोरडय़ा वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू वेगाने वाढत असल्याने आजाराच्या साथीवर नियंत्रण ठेवणे स्थानिक आरोग्य विभागाला कठीण जात होते. मात्र त्यानंतर प्रत्येक वर्षांगणिक स्वाइन फ्लू या आजाराचा प्रभाव कमी होत गेला. २०१० पासून २०१४ पर्यंत या १३०१ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. त्यातील ३३ जणांना जीव गमावावा लागला.
या वर्षी जानेवारीपासूनच नाशिक, पुणे या भागात स्वाइन फ्लूची साथ वेगाने पसरली. फेब्रुवारीपासून मुंबईत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. शहराबाहेरील परिसरातून उपचारांसाठीही रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात येऊ लागले. स्वाइन फ्लू रोखण्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले गेले. मात्र तरीही जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील १६४६ रुग्णांना स्वाइन फ्लू झाला. त्यातील १८ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला. त्याचप्रमाणे शहराबाहेरून उपचारासाठी आलेल्या २२१ रुग्णांपैकी ३० जणांचा मृत्यू झाला, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ तसेच आधीपासूनच एखादा आजार असल्याने प्रतिकारक क्षमता कमी झालेल्यांची संख्या अधिक आहे.
उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दररोज सरासरी ४० रुग्णांची संख्या आता दहा ते बारा रुग्णांवर आली आहे. मात्र तरीही गेल्या आठवडय़ाभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने या आजाराचे सावट शहरावर अजूनही आहे.