भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीतर्फे सीताबर्डीतील रामगोपाल माहेश्वरी भवनात रविवारी सहकार कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, महापौर प्रा. अनिल सोले, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रमेश मंत्री, कमलाकर लोखंडे, विनायक देशपांडे, दादासाहेब कोलारकर, वसंतराव देवपुजारी, जानराव गजभिये, बबनराव भुयारकर, बाबासाहेब बोरीकर, संजय भेंडे, घनश्याम कुकरेजा, अॅड. उल्हास औरंगाबादकर, नीलिमा बावणे या मान्यवरांसह सहकार आघाडीचे पालक श्रीपाद रिसालदार, अध्यक्ष शिरीष पुरोहित उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, सहकार क्षेत्राबद्दल फार गैरसमज निर्माण झाले आहेत. ज्यांच्याकडून चुका झाल्या, त्यांच्यावरच कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु ज्यांच्याकडून चुका होत नाही, असे प्रामाणिक कार्यकर्तेही यात भरडले जात आहे. गरिबांचा, सामान्य नागरिकांचा विकास झाला पाहिजे, त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हे सहकार क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. सामाजिक जाणीव ठेवून कार्य केले तर चळवळही टिकेल आणि माणूसही टिकेल. परंतु सध्या राज्य सरकार आकसपणे सहकार क्षेत्रावर कारवाई करत आहे. त्यामुळे या चळवळीचा उद्देशच पूर्ण होत नाही. उलट या क्षेत्रात येण्यासही आता कुणी तयार होत नाही. तेव्हा, सहकार क्षेत्राला जाचक असलेले कायदे बदलवण्याची खरी गरज आहे.
अनेक सहकारी संस्था चांगल्या काम करीत असताना कर्जाची परतफेड करण्यात येत नसताना त्या डबघाईस आल्या असल्याकडे लक्ष वेधून गडकरी म्हणाले, ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी त्याची परतफेड केलीच पाहिजे. यासाठी सहकारी संस्थांनी कमीत कमी कर्जावर व्याज आकारणी केली पाहिजे. कर्जाची उचल आणि त्याची परफेड योग्य वेळी योग्य पद्धतीने झाली तर सहकार टिकेल. सहकार चळवळीच्या वाढीसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. महापौर अनिल सोले यांचे मेळाव्यात भाषण झाले. एखाद्या संस्थेने चूक केल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रालाच जबाबदार ठरवून शासनाने कठोर र्निबध लादू नये, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑप. बँक लि.चे अध्यक्ष जानराव गजभिये यांनी केली. याप्रसंगी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नितीन गडकरी यांच्या हस्ते काकासाहेब लोखंडे, बाळासाहेब देशपांडे, दादासाहेब कोलारकर, वसंतराव देवपुजारी, बबनराव भुयारकर, जानराव गजभिये, रमेश मंत्री आणि बाबासाहेब बोरीकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनिल देव यांनी संचालन केले, तर चंद्रशेखर खोपे यांनी आभार मानले. या मेळाव्याला सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.