शिक्षक आणि आई हे समाजाला घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत. या दोघांच्या मार्गदर्शनातून सुजाण नागरिक घडत असतो, असे प्रतिपादन ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी केले. येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचालित लासलगाव महाविद्यालयातील कवी प्राध्यापक शिरीष गंधे यांच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
गंधे हे सर्जनशील प्राध्यापक असून महाविद्यालयातील ते एक ज्ञानी योद्धा आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘कार नसलेला प्रवचनकार’ यासारखे असल्याने निवृत्तीनंतरच्या कालावधीत सामाजिक विषयांवर त्यांनी समाजाचे प्रबोधन करावे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. यापुढील काळात त्यांच्या लेखणीतून विविध साहित्यकृती वाचकांसमोर येतील असेही ते म्हणाले.
या प्रसंगी प्रा. शशांक गंधे यांनी गंधे परिवाराचा लेखाजोखा मांडला. कवी शिरीष गंधे यांनी ३२ वर्षे लासलगाव महाविद्यालयात अध्यापन केले असून महाविद्यालयाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी लासलगाव महाविद्यालयाचे सचिव गोविंद होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, चित्रपट निर्माते दिग्दर्शक व समीक्षक योगेश्वर गंधे, कवी प्रकाश होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी केले.