कधी श्लोक, कधी थोर पुरुषांच्या गोष्टी, ज्येष्ठांचा आदर या माध्यमातून लहान मुलांमध्ये सुसंस्कार घडविण्यासाठी शाळा-शाळांमध्ये जाऊन पंचवटीतील सचिन अहिरे हे शिक्षक प्रयत्न करीत असून, त्यांचा हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य असल्याने अनेक शाळा त्यांना आमंत्रित करीत आहेत.
एकत्र कुटुंब पद्धत असणारी घरे आता अल्प प्रमाणात दिसतात. अशा कुटुंबांमध्ये आजी-आजोबांकडून नातवांना गोष्टींमार्फत, उपदेश करीत संस्कार केले जातात. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीत याची वानवा असते. शहरात मुलांवर संस्कारासाठी बाल संस्कार केंद्रांची संख्या वाढत असली तरी अशा केंद्रांकडून घेतले जाणारे शुल्क सर्वानाच परवडते असे नव्हे. अशा परिस्थितीत सचिन अहिरे हे शिक्षक शाळांमध्ये जाऊन मुलांवर योग्य संस्कार व्हावेत म्हणून विनामूल्य प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी कधी ते श्लोकांचा आधार घेतात तर कधी थोरामोठय़ांच्या गोष्टींचा. अनेक शाळांमध्ये त्यांनी आपला हा उपक्रम राबविला असून, सध्या ते तपोवनातील ब्रम्हा व्हॅली शाळेत नियमितपणे आपला उपक्रम राबवीत आहेत. लहान वयातच योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे ही मुले बिघडण्याचा धोका असतो. चित्रपट व टीव्हीच्या वाढत्या प्रभावामुळे तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे ज्येष्ठांचा आदर करावयास ही मुले विसरतात. त्यासाठीच त्यांच्यावर योग्य वेळी सुसंस्कार घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे अहिरे यांचे म्हणणे आहे. ज्या शाळांना अहिरे यांच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी ९८२२०९४४३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.