आपले पहिले लग्न झाल्याची माहिती दडवून दुसरे लग्न केल्याच्या आरोपातून हणमंत ज्ञानोबा लवटे (रा. नगर टाकळी रोड, पंढरपूर) या शिक्षकाची मुक्तता केली आहे. सोलापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन वर्षांची सक्तमजुरी व २५ हजारांची दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी अपिलात रद्दबातल ठरविली. या शिक्षकाने दुसरा विवाह केल्याचे सिध्द करता आले नाही. त्याचा फायदा देत आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.
आरोपी शिक्षक हणमंत लवटे याचा गिरीजा नावाच्या तरुणीबरोबर १९९८ साली विवाह झाला होता. मात्र त्यानंतर त्याने गीता नावाच्या दुसऱ्या तरुणीबरोबर पहिले लग्न झाल्याची माहिती दडवून विवाह केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपात म्हटले होते, की तो दुसरी पत्नी गीता हिचा छळ करू लागला. म्हणून तिने चौकशी केली असता आरोपी हणमंत याचा पहिला विवाह १९९८ सालीच झाल्याचे व त्याने पहिल्या पत्नीला न नांदवता, ही माहिती दडवून आपल्याबरोबर दुसरा विवाह केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गीता हिने आरोपी पती हणमंत लवटे याच्याविरुध्द सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले होते. यात कनिष्ठ न्यायालयाने हणमंत यास दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व २५ हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यावर आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
या अपिलाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पाटील यांच्यासमोर झाली. आरोपीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी युक्तिवाद केला. पहिले व दुसरे लग्न हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सप्तपदी पूर्ण करून झाल्याचे निश्चितपणे सिद्ध करणे आवश्यक आहे. परंतु तसा पुरावा न्यायालयात दिला गेला नाही. त्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे संदर्भादाखल सादर केले. अ‍ॅड.थोबडे यांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरत सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात अ‍ॅड. थोबडे यांना अ‍ॅड. सुरेश जगदाप, अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी, अ‍ॅड. अभिजित इटकर, अ‍ॅड. दत्ता गुंड यांनी साह्य़ केले, तर सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी बाजू मांडली.