भयावह दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या काळात माणसे संघर्ष करून जगतीलही मात्र, मूक पशु-पक्ष्यांचे काय? या प्रश्नाला कृतिशील उत्तर देण्यासाठी चिखली तालुक्यातील शेलसूर येथील शिवाजी विद्यालयाचे संचालक तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा परिसरासह गावातील तीनशेहून अधिक झाडांवर मातीच्या कुंडीचे पाणवठे लावले आहेत. आता या पाणवठयावर खारूताई, चिऊताईसह सगळेच लहान मोठे पक्षी तहान भागविण्यासाठी येत असून त्यांच्या किलबिलाटामुळे शेलसूरात दुष्काळातील जिवंत पक्षी संग्रहालय निर्माण झाले आहे.
दुष्काळात तहानलेले पक्षी जगवा असा संदेश देणारे असंख्य असतात. पण कृती करणारे मोजकेच असतात. चिखली तालुक्यातील शेलसूरात तीव्र पाणीटंचाई आहे. सगळीकडे बैलगाडय़ा तसेच टॅंकर्सने या गावांला पाणीपुरवठा होत आहे. अशा पाणी युध्दाच्या काळात शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष सुनील देशमुख, संचालक अरविंद देशमुख, सभापती माधुरी देशमुख, मुख्याध्यापक एस.ए.देशमुख आणि हरीत सेना शिक्षक घनश्याम कापसे यांनी शाळा परिसर तसेच गावातील सर्व झाडांवर मातीच्या कुंडीचे पाणवठे उभारण्याची संकल्पना मांडली. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
संस्थाचालक, स्थानिक स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक यांच्या मदतीतून मलकापूर जवळच्या तळणी गावांतून मातीच्या पक्क्या भाजलेल्या टिकाऊ कुंडया आणण्यात आल्या आणि हा हा म्हणता तीनशेहून अधिक पक्षी पाणवठे तयार झाले. आता या पाणवठयात आपले कर्तव्य म्हणून झाडावर चढून विद्यार्थी पाणी टाकतात. खारूताई, चिऊताई, पोपट, कावळे असे विविध जातीचे पक्षी या पाणवठयावर तहान भागवितात. शेलसूर आता पक्ष्यांचे गाव झाले आहे. संध्याकाळी कानाला सुखावणारा पक्ष्याचा चिवचिवाट आजच्या दुष्काळी वाळवंटात मानवतेच्या हिरवळीचा सुखद धक्का गावाला देतो. ‘परत फिरूनी ये पाखरा, आम्ही देतो तुम्हा अन्न पाण्याचा आसरा’, असाच संदेश शेलसूरच्या शिवाजी परिवाराने दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2013 रोजी प्रकाशित
परत फिरूनी ये पाखरा, आम्ही देतो तुम्हा आसरा
भयावह दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या काळात माणसे संघर्ष करून जगतीलही मात्र, मूक पशु-पक्ष्यांचे काय? या प्रश्नाला कृतिशील उत्तर देण्यासाठी चिखली तालुक्यातील शेलसूर येथील शिवाजी विद्यालयाचे संचालक तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा परिसरासह गावातील तीनशेहून अधिक झाडांवर मातीच्या कुंडीचे पाणवठे लावले आहेत.

First published on: 12-03-2013 at 05:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers and students of shivaji vidyalay providing water facility to birds in drought affected shelsur village