नवीन अभ्यासक्रमाची गरज, त्याचे महत्त्व, शिकविण्याच्या पद्धतीतील बदल याविषयी येथील उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने उन्नती प्राथमिक विद्यालयात आयोजित नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पेठचे गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मल आणि नाशिकचे शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. जगताप यांनी मार्गदर्शन केले. सोसायटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, संस्थेचे प्रभारी सरचिटणीस अ‍ॅड. प्रवीण अमृतकर, सुभाष कुंभारे, बापुराव शिनकर हे उपस्थित होते. निर्मल यांनी मूल हे केंद्रस्थानी मानत शिकविण्याचे आवाहन केले. ज्ञानसंरचना वादाचा अभ्यास करून शिकविणे आवश्यक आहे. मुलाच्या वाढीच्या अवस्था त्यांनी समजावून सांगितल्या. शिक्षकाजवळ मुलांच्या अनुभवांसंबंधित ज्ञान असेल तर ते लवकर शिकण्यास प्रवृत्त होतात. भावी आयुष्यात उपयुक्त पडेल असे ज्ञान, कौशल्य, वृत्ती, अभिरुची, तर्क, अनुमान विकसित करण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. दुसऱ्या सत्रात जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या लेखी कामावरून नाही तर तोंडी कामातून ज्ञान पाहावे, असा सल्ला दिला. दैनिक विषयाचे मुद्दे त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले. मुलांना प्रश्न विचारण्याची संधी द्या. शिक्षकांनी १०० टक्के वाचन व २० टक्के बोलावे असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका अश्विनी अहिरे यांनी केले.