लातूर महापालिका आयुक्तपदी सुधाकर तेलंग यांची नियुक्ती झाली. सध्या ते सिडको, औरंगाबाद येथे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. नगरविकास खात्याने तेलंग यांची लातूरला बदली केल्याचा आदेश दिला.
लातूर महापालिकेचे आयुक्तपद बऱ्याच दिवसापासून रिक्त होते. लातूर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्षभरापूर्वी महापालिकेची निवडणूक होऊन लोकनियुक्त पदाधिकारी कार्यरत झाल्यानंतर ऋचेश जयवंशी पहिले आयुक्त म्हणून रुजू झाले होते. काही महिन्यांतच सरकारने त्यांची तातडीने गडचिरोलीला बदली केली. तेव्हापासून उपायुक्त धनंजय जावळीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार होता. लातूर नगरपालिकेतून महापालिकेत आलेल्या जवळपास आठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनात मोठे फेरबदल होणार होते. तेलंग यांनी याआधी लातूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.