मराठी चित्रपटांमध्ये ठरीव फॉम्र्युल्याच्या थोडेसे बाहेर जाऊन अधूनमधून काही चित्रपट येतात. प्रेमकथापट, विनोदपट, फार्स, कौटुंबिक, सामाजिक या प्रकारांमध्ये अधिक मराठी चित्रपट येतात; परंतु उपहासात्मक पद्धतीने चित्रपट मराठीमध्ये खूप कमी आहेत. ‘तेंडुलकर आऊट’ हा उपहासात्मक शैलीतला वेगळा चित्रपट म्हणता येईल. पडद्यावर जे काही पाहायला मिळते त्याने चुरचुरीत हसवणूक होते, टाइमपास होतो.
आपला मुलगा सचिन तेंडुलकरसारखा खेळावा, तसाच व्हावा, त्याने चौफेर फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना मैदानावर धूळ चारावी अशी अनेक पालकांची इच्छा असते. आपल्या घरात सचिन तेंडुलकर जन्माला यावा अशी इच्छा असते. ही इच्छा एका चित्रपट निर्मात्याची आहे. सुनील तेंडुलकर असे या निर्मात्याचे नाव आहे. केवळ आपले आडनाव तेंडुलकर आहे म्हणून त्याला आपला मुलगा सचिन तेंडुलकरसारखा व्हावा अशी त्याची इच्छा आहे. बी ग्रेडचे कामुक चित्रपट काढणारा हा निर्माता आहे. भरपूर पैसा असल्यामुळे त्याला खंडणीखोर गुंडांचे फोन सारखे येत असतात. चित्रपट निर्माताच असल्याने या खंडणीखोरांनाही तो फसविण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे त्याच्या खुनाची सुपारी दिलेले नायर-लेफ्टी-अब्बास हे तरुणांचे त्रिकुट त्याच्या मागावर असते. पण त्याची तेंडुलकरला कल्पनाच नसते. तेंडुलकरची बायको गरोदर आहे आणि सचिनच्या वाढदिवशी २४ एप्रिललाच मूल जन्माला यावे म्हणून ती आणि तेंडुलकर सारखी देवाकडे प्रार्थना करीत आहेत. एकीकडे अननुभवी हत्येखोरांचे त्रिकुट आणि तेंडुलकरच्या चित्रपटातील नायिकेसोबत त्याचे पार्टीत रममाण होणे आणि यात घडणाऱ्या गमतीजमतीच्या घटना याभोवती सिनेमा फिरतो.
रूढार्थाने आखीव-रेखीव कथानक नसलेला हा चित्रपट दिग्दर्शकापेक्षाही लेखकाचा आहे, असे म्हणावे लागेल. उपहासात्मक शैली सबंध चित्रपटात लेखक-दिग्दर्शकाने मांडली आहे.
चित्रपटाला काही हेतू नसला तरी पडद्यावर ज्या गमतीजमती घडतात त्याने करमणूक नक्कीच होते. रूढार्थाने हा चित्रपट टाइमपास न वाटता काही अंशी प्रेक्षकांना भंपकपणाही वाटू शकेल. परंतु लेखक-दिग्दर्शकाने उपहासात्मक शैलीचा वापर करीत करमणूक करण्यात यश मिळविले आहे. व्यक्तिरेखांसाठी कलावंतांची चपखल निवड करण्यासाठीही दिग्दर्शकाला दाद द्यायला हवी.
पहिल्यांदाच पिस्तुलाने कुणाची तरी हत्या करायला निघालेले त्रिकुट, त्यांची भंबेरी उडणे, फजिती होणे, मधेच पिस्तूल हरवणे अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून धमाल करमणूक होते. सबंध सिनेमात अब्बास ही व्यक्तिरेखा भाव खाऊन जाते. सर्वच कलावंतांनी आपापल्या परीने भूमिकांना न्याय दिला आहे. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाला पाश्र्वभूमीवर क्रिकेट समालोचनाची जोड देऊन बेमालूम मिश्रण केल्यामुळेही हास्यांची कारंजी उडतात. कोणत्याही एका उद्देशाने, मसालापट न दाखविताही करमणूक करता येऊ शकते हे या चित्रपटाने यशस्वी करून दाखविले आहे.
तेंडुलकर आऊट
झी टॉकीज प्रस्तुत
निर्माता- सुधा प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक- स्वप्ननील जयकर
कथा-पटकथा-संवाद- योगेश जोशी
कलावंत- सयाजी शिंदे, संतोष जुवेकर, विजय मौर्य,
सई ताम्हणकर, नीलम शिर्के, अनिकेत विश्वासराव, टेडी मौर्य, अतुल परचुरे व अन्य.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2013 रोजी प्रकाशित
चुरचुरीत टाइमपास
मराठी चित्रपटांमध्ये ठरीव फॉम्र्युल्याच्या थोडेसे बाहेर जाऊन अधूनमधून काही चित्रपट येतात. प्रेमकथापट, विनोदपट, फार्स, कौटुंबिक, सामाजिक या
First published on: 17-11-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar out entertaining marathi film