ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने जप्त केल्यानंतर आज शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कारखान्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगारांनी फाटकावरच त्यांना अडविल्यामुळे आल्या पावली परत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. जिल्हा बँकेच्या प्रशासनाने थकीत कर्ज वसुलीसाठी तेरणा कारखान्यातील मशिनरी आणि स्टोअर २३ नोव्हेंबर रोजी सील केले आहे. त्यातच कामगारांनीही थकीत वेतनासाठी आंदोलन पुकारलेले असल्यामुळे संचालक मंडळ पुरते अडचणीत आलेले आहे. दरम्यान, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार राजेनिंबाळकर हे कारखान्यात गेले होते. मात्र कामगारांनी फाटकावरच त्यांना अडविले. तेथे त्यांनी कामगार कृती समितीचे पदाधिकारी रामभाऊ देशमुख, अफजल काझी, पडवळ यांच्याशी चर्चा केली. कारखान्याचे फाटक व कार्यालय उघडण्याची विनंती केली. मात्र, कामगारांनी आधी आमच्या पगारी रजा द्या, मगच गेट उघडू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आमदार राजेनिंबाळकर यांना गेटवरूनच परत यावे लागले.