महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलविरोधात पुकारलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवार रात्रीपासूनच ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच महामार्ग, टोलनाके तसेच मुख्य रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्य़ातील प्रमुख मार्गाना पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. बुधवारी सकाळी मनसेचे कार्यकर्ते खारेगाव तसेच मुलुंड चेकनाक्यावर आंदोलन करण्यासाठी आले. पण त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे आंदोलन फसले. दरम्यान, ठाणे शहरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची मंगळवारी रात्रीपासूनच धरपकड सुरू केल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात देणे पसंत केले. त्यामुळे शहरात रास्ता रोको आंदोलन उभेच राहिले नाही, असे चित्र होते. या आंदोलनाविषयी माहिती असल्यामुळे अनेक नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले. शहरातील रस्त्यांवर वाहनांची नेहमीपेक्षा कमी वर्दळ असल्याचे दिसून आले. ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी सुमारे ६०० हून अधिक, तर ग्रामीण पोलिसांनी दोनशेहून अधिक मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच ठाणे शहर पोलिसांनी मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि आंदोलनात सक्रिय असलेल्या सुमारे दोनशेहून अधिक, तर ग्रामीण पोलिसांनी सव्वादोनशे कार्यकर्त्यांना अटक केली होती. आनंदनगर, मॉडेला, खारेगाव, घोडबंदर, कशेळी, काटई यांच्यासह जिल्ह्य़ातील सर्वच टोलनाक्यांवर कडेकोट बंदोबस्तात टोलवसुली सुरू होती. मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-अहमदाबाद महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीनहात नाका परिसरात टायर जाळून पळून गेल्याचा प्रकार घडला. खारेगाव तसेच मुलुंड चेकनाका परिसरात मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी आले. त्याच वेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. चोख पोलीस बंदोबस्तामुळे शहरातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
पिंजऱ्याऐवजी टीएमटी..
रास्ता रोको आंदोलनाकरिता मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने रस्त्यावर येतील. या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी पिंजरे अपुरे पडतील, असा ठाणे पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी ठाणे पोलिसांनी टीएमटीची मदत घेतली होती. मुलुंड चेक नाका परिसरात ठाणे परिवहन सेवेची वागळे आगार बस उभी करून ठेवण्यात आली होती. महिला कार्यकर्ते आंदोलनासाठी येताच पोलिसांनी त्यांना टीएमटीच्या बसमध्ये बसविले. त्यानंतर ही बस कार्यकर्त्यांना वागळे पोलीस ठाण्यात घेऊन गेली. मनसेच्या शहरातील काही कार्यालयांबाहेरही टीएमटीच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्ते घोषणा देऊ लागताच त्यांना या बसेसमध्ये बसविण्यात येत होते. आंदोलन रस्त्यावर येऊ द्यायचे नाही, ही पोलिसांची रणनीती यशस्वी ठरल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे दिसत होते.
व्हॉट्सअॅपमुळे आंदोलनाचे बेत फसले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचे बेत आखले खरे, पण या आंदोलनाविषयीची माहिती सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅपवर येऊ लागली. मनसेचे कार्यकर्ते नेमके कुठे, कसे आणि किती वाजता आंदोलन करणार, याचे संदेश सकाळपासूनच व्हॉट्सअॅपवर येत होते. ते संदेश पोलिसांपर्यंत पद्धतशीरपणे पोहोचत होते. त्यामुळे कार्यकर्ते आंदोलन करण्याआधीच पोलीस मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करीत होते. त्यामुळे व्हॉट्सअॅप हे माध्यम मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन फसण्यामागचे मोठे कारण ठरले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात मनसे, रहिवासी दोघेही थंड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलविरोधात पुकारलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवार रात्रीपासूनच ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच महामार्ग, टोलनाके तसेच मुख्य रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
First published on: 13-02-2014 at 12:37 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane cool mns toll agitation