ठाणे शहरात अलीकडच्या काळातच सुरू झालेला ‘विवियाना’ मॉल शहरवासीयच नव्हे तर मुंबई, नवी मुंबईतील ग्राहकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनला आहे. अवाढव्य स्वरूप, आंतरराष्ट्रीय ब्रँडची रेलचेल, आकर्षक रचना या सर्वामुळे हा मॉल अल्पावधीत प्रकाशझोतात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराचे ‘स्टाइल स्टेटमेंट’ ठरू शकेल असा मॉल ठाण्यातच का?
ठाणे परिसरात आमच्याकडे मोठी जागा उपलब्ध होती. या जागेचा कशा प्रकारे विकास करायचा यासाठी आमच्या कंपनीने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ठाणे शहराच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. या सर्वेक्षणात ठाण्याचा होत असलेला विकास, येथे राहायला येणारे नागरिक, त्यांचे जीवनमान, त्यांची क्रयशक्ती आणि त्यांच्या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला. त्या वेळी या शहराबद्दलची खूपच सकारात्मक माहिती समोर आली. वेगाने वाढणारे हे शहर भविष्यातील सगळ्यात मोठी व्यावसायिक संधी आहे, याची जाणीव झाल्यानंतर या भागामध्ये लोकांना हव्या त्या गोष्टी, हवे ते ब्रॅण्ड आणि हव्या त्या सुविधा देणारा एक मोठा मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच विवियाना मॉल ठाण्यात आला.

* ठाण्यामध्ये बडय़ा ब्रॅण्डचे मोठे मॉल सेवा देत असताना विवियाना मॉल इतरांपेक्षा कसा वेगळा आहे. तसेच त्यांची काय वैशिष्टय़े आहेत?
– शहरातील सगळ्यात मोठा मॉल अशी आमची ओळख झाली आहेच. शिवाय या मॉलमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची २५० हून अधिक ब्रॅण्ड एकाच छताखाली उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे काही ब्रॅण्डस्चे भारतातील पहिले दुकान हे आमच्या मॉलमध्ये सुरू झाले आहे. बाटाचे सगळ्यात मोठे दुकान आमच्या मॉलमध्ये आहे. झारा आणि फॉरएव्हर या जागतिक दर्जाचे बॅ्रण्डस् एकाच ठिकाणी मिळू शकेल, असे ठिकाण भारतात केवळ विवियानामध्ये आहे. स्टार बर्ग, हॅमलेजसारख्या अनेक बॅ्रण्डस्ची उदाहरणे आहेत. १४ स्क्रीनचा सर्वात मोठा मल्टीप्लेक्स विवियानामुळे ठाण्यात येऊ शकला आहे. त्यामुळे खरेदी आणि आनंदासाठी मुंबईकडे जाणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घराजवळ खरेदीचा आनंद देण्याचा प्रयत्न या मॉलच्या निमित्ताने झाला असे म्हणता येईल, त्यामुळे आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत.

* आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डस्चा ठाण्यात येण्याविषयीचा कल कसा होता?
आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डस्साठी भारतीय बाजार आकृष्ट करू लागला आहे. त्यांना इथे येण्याची उत्सुकता होती. शिवाय आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून येथील रहिवाशांची संपूर्ण माहिती आमच्याकडे होती. त्यामुळे इथेही मुंबईइतकाच किंबहुना त्याहून अधिक चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डस्नी त्यांची दुकाने इथे थाटली आहेत.

ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे?
– आमचा सगळा भर हा ठाणे शहरावरच आहे. ठाणे शहरातील ग्राहक आमचे सगळ्यात पहिले लक्ष्य आहे. सुमारे ७० ते ७५ टक्के ग्राहक हे ठाणे शहरातूनच येतात. त्याचप्रमाणे डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, अंबरनाथ तसेच बदलापूर येथूनही विवियानामध्ये ग्राहक येतात. अगदी मुंबईतील मुलुंड आणि इतर जवळच्या ठिकाणांहूनही ग्राहक इथे येत असतात. पूर्वी शॉपर्स स्टॉपसारख्या बॅ्रण्डसाठी ठाण्यातील ग्राहकांना मुंबई, मुलुंड किंवा कल्याणमध्ये जावे लागत होते. मात्र आता त्यांना शॉपर्स स्टॉप ठाण्यात उपलब्ध आहे. शिवाय सिनेपोलीसच्या आगमनानंतर या ग्राहक संख्येत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

१४ स्क्रीन असलेल्या सिनेमागृहाची आवश्यकता आहे का?
– नक्कीच आहे, सिनेपोलीस या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतातील सगळ्यात पहिला करार विवियान मॉलसोबत केला होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ठाण्यामध्ये सुरू होण्यासाठी काही काळ उशीर झाला. मात्र लोकांना सिनेपोलीसबद्दल कमालीची उत्सुकता होती. ठाण्यातील प्रेक्षक संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे ती गरज भागवण्यासाठी मोठय़ा मल्टीप्लेक्सची गरज होती. ती सिनेपोलीसमुळे पूर्ण होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट पाहण्याची सुविधा सिनेपोलीसच्या निमित्ताने उपलब्ध करण्यात आली आहे. अनेक चांगले हिंदी, इंग्रजी आणि मराठी चित्रपटही ठाण्यातून मोठी कमाई करीत आहेत. पीकेच्या निमित्ताने प्रेक्षकांची संख्या कमालीची वाढली होती. सिनेपोलीसमुळे वाढलेल्या ग्राहक संख्येमुळे मल्टीप्लेक्सची गरज दिसून येते.

* ठाण्यातील मॉल उद्योगामध्ये स्पर्धा आहे का? त्यांचे स्वरूप कसे आहे.
– ठाण्यामध्ये अत्यंत कमी परिघातच मोठे मॉल आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये
स्पर्धा आहे. हे खरे असले तरी ठाण्याचे मार्केटही प्रचंड मोठे आहे. अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्याबाबत निश्चितच स्पर्धा होईल.

* इथले ग्राहक कसे आहेत?
– ठाण्यातील ग्राहक खूप हुशार आहेत. ब्रॅण्डबद्दल त्यांचे ज्ञान, त्यांची समज चांगली आहे. त्यांना त्याची पुरेशी माहिती असल्याने त्यांना फक्त अशा सेवेची गरज होती. ती आम्ही पूर्ण केली आहे. महिन्याला ७ लाखांहून अधिक ग्राहक भेट देत असून त्यांच्या संख्येत सिनेपोलीसमुळे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

* ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपण काय प्रयत्न करीत आहात?
मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा दिवस आनंददायी ठरावा यासाठी ‘सेलिब्रेट एव्हरी डे’ असा प्रयत्न आमच्याकडून केला जात आहे. महिलांसाठी विशेष कार्यक्रम, म्युझिक, गेम आणि सणांच्या निमित्ताने खास सेलिब्रेशन हे इथे होते. शिवाय या मॉलमध्ये मुलांसाठी सगळ्यात मोठी फन सिटी आहे. महिला, तरुण आणि ज्येष्ठांसाठीही आम्ही विविध उपक्रम राबीवत असतो. अंध व्यक्तींना मॉलमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून ‘झेव्हियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड’ संस्थेचे संचालक डॉ. सॅम तारापोरवाला यांनी ब्रेल मेन्यू कार्डसारखा उपक्रम राबवला आहे. मॉलच्या वतीने त्यास संपूर्ण सहकार्य करून आता ‘ऑडिओ टेक्स्टाइल फ्लोअर प्लॅन’सुद्धा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच अंध आणि अपंगांसाठीही आमच्याकडे चांगली सुविधा उपलब्ध आहे. सुरुवातीच्या काळात या भागातून
रिक्षा उपलब्ध होत नव्हत्या, ही अडचण लक्षात घेऊन विवियानामधून प्रवाशांना ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांना त्यांच्या ठरावीक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मोफत गृहउपयोगी साहित्य खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा मिळाली आणि रिक्षाचालकांना त्यांचा मोबदला मिळू शकला.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane will be big commercial city in future
First published on: 28-01-2015 at 09:11 IST