मराठी प्रेक्षकांना एका मराठी चित्रपटात थेट इंग्रजी किंवा हिंदी चित्रपटांतील नृत्यांचा अनुभव देणाऱ्या ‘आयना का बायना’ या चित्रपटातील सर्व नृत्ये प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहेत. मात्र या सर्व नृत्यांबाबत एक धम्माल माहिती थेट दिग्दर्शक समित कक्कड याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितली. ही सर्व नृत्ये मूळ इंग्रजी गाण्यांवर चित्रित करण्यात आली होती. त्यानंतर अजित परब व समीर म्हात्रे या संगीतकार द्वयीने आणि जितेंद्र जोशीने त्या गाण्यांना हिंदी आणि मराठी या भाषांचा टच दिला आहे.
‘आयना का बायना’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणे, हे आमच्यासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक होते. ही नृत्ये इंग्रजी गाण्यांवर चित्रित केली होती. त्यानंतर मग आम्ही त्या संगीताची लय लक्षात घेत नवीन संगीत बांधले, अशी माहिती अजित परब याने दिली. विशेष म्हणजे हे करत असताना एखाद्या खास स्टेपसाठी, खास ओळीसाठी अजित-समीरला त्याप्रमाणे संगीत बांधावे लागले. जितेंद्रनेही त्या संगीताचा आणि पटकथेचा अर्थ लक्षात घेऊन मग गाणी लिहिली. मात्र चित्रपट पाहताना कुठेही सर्व नृत्ये मूळ इंग्रजी गाण्यांवर चित्रित करण्यात आल्याचे जाणवत नाही.
या चित्रपटातील ‘मौला मेरे’ या गाण्याला स्वत:चे एक कथानक आणि भावना आहेत. त्यामुळे त्या गाण्याचे संगीत शब्दांना पूरक असणे आवश्यक होते. दिग्दर्शक समित कक्कडने आम्हाला त्या गाण्याचा व्हिडीओ दिला. त्यानंतर जितेंद्रने तो व्हिडीओ बघून त्यावर एक कविता लिहिली. जितेंद्र वाचताना ती कविता अत्यंत चपखल बसत होती. मात्र त्या कवितेचे गाणे करताना जितेंद्र आणि आम्हाला मेहनत घ्यावी लागली, असेही अजितने सांगितले. सध्या संगीत हे संगणकावर होत असल्याने प्रत्येक इंग्रजी गाण्याची लय सापडल्यावर आम्हाला संगीत बांधणे सोपे गेले. मात्र असे असले तरी समीर म्हात्रे याने खूप मेहनत घेतल्याचेही अजितने स्पष्ट केले.
मराठी चित्रपटात संपूर्ण नृत्ये इंग्रजी भाषेतील गाण्यावर चित्रित आणि संकलित केल्यानंतर त्या गाण्यांचे संगीत आणि भाषा बदलण्याचा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. हे पहिलेपणाचे आव्हान पेलताना खूप मजा आली, असे समित कक्कड आणि अजित परब या दोघांनीही स्पष्ट केले.