प्लास्टिक बंदी कायदा धाब्यावर!

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कायद्याने बंदी असूनही ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरामध्ये त्यांचा सर्रास वापर केला जात आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कायद्याने बंदी असूनही ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरामध्ये त्यांचा सर्रास वापर केला जात आहे. गल्लीबोळातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या प्रमाणावरून प्लास्टिक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुढे येत आहेत. कायद्याचे भय नसलेले फेरीवाले, हातगाडय़ा आणि दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर खुलेआम सुरू आहे. मुंबई ग्राहक पंचायतने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमधील प्लास्टिकच्या वाढत्या भस्मासुराचा सखोल अभ्यास सुरू केला असून या शहरांमध्ये प्लास्टिक बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजाणी होत नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळे या तीनही शहरांच्या पालिका आयुक्तांना पत्र लिहून प्लास्टिक बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबई महापालिकेतून या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी ठाणे आणि नवी मुंबई शहरातून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा ही संस्था करत आहे.
भाज्या, फळे आणि साहित्य नेण्यासाठी आजही मोठय़ा प्रमाणावर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याचे आढळून येते. त्यामुळे ठाणे, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये प्लास्टिकच्या प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमानुसार शहरात प्लास्टिक बंदीचा कायदा राज्य शासनाच्या वतीने लागू करण्यात आला असला तरी शहर पातळीवर महापालिकेच्या वतीने त्याची प्रभावी अंमलबजावणीच होत नसल्याचा निष्कर्ष मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने काढण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका स्तरावर या बंदीची अंमलबजावणी करत संबंधितांवर कारवाई करण्याचे साकडे महापालिका आयुक्तांना संस्थेच्या वतीने घालण्यात आला आहे.
महापालिकेकडून संस्थेच्या अपेक्षा..
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा मुंबई ग्राहक पंचायतने व्यक्त केली आहे. त्यामध्ये महापालिका कार्यालयात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर १०० टक्के बंदी घालण्यात यावी. महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती करावी. स्थानिक पातळीवर नियमित दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादन, वितरण आणि साठा यांच्यावर धाडी घालाव्यात. परवाने रद्द करणे, जप्ती करणे, दंडवसुली या माध्यमातून संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. मार्केट, बसस्थानक, रेल्वेस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी जनजागृती फलक लावण्यात यावेत, अशी अपेक्षा संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आली आहे.
प्लास्टिकमुक्त परिसर अभियान
मुंबई ग्राहक पंचायत ही आंतराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणारी आशियातील अग्रगण्य संस्था असून ग्राहकांच्या हितासाठी संस्थेने प्लास्टिकमुक्त परिसर हे अभियान सुरू केले आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून संस्था जनजागृती कार्यक्रम आखत आहेत. तसेच भाजीवाले, दुकानदार यांना स्वस्त दरामध्ये कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्राहकांमध्ये प्रबोधन करणारे उपक्रम संस्थेने सुरू केले आहेत, अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतच्या ठाणे विभागाच्या स्वाती टिल्लू यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The ban on plastic bags