ग्रामीण भागात अनेक ताकदीचे लेखक आहेत. त्यांना शोधणे व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लिहिणाऱ्या माणसांच्या लिखाणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांना चार गोष्टी समजावूनही सांगितल्या पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रभू राजगडकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्या वतीने धनवटे सभागृहात लेखन प्रकाशन व्यवहार कार्यशाळेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून राजगडकर तर विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. पत्रकार-लेखक श्याम पेठकर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते. राजगडकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आपले लेखन जगापुढे यावे असे अनेकांना वाटत असते पण लेखनात अनेक त्रुटी असतात. त्यामुळे प्रकाशक पुस्तक जसेच्या तसे प्रकाशित करू शकत नाही. त्यावर संपादनाचे संस्कार होणे तसेच लेखनातील गुणवत्ता, कलात्मकता व साहित्यिक मूल्य तपासले जाणे महत्त्वाचे असते. त्यामुळे नवीन लेखकांनी पुस्तक प्रकाशनाची घाई न करता थोडा धीर ठेवावा व प्रकाशकाचेही ऐकून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखक व प्रकाशक यांचे संबंध तसेच प्रकाशकांचे त्यांना आलेले अनुभव खुसखुशीत पद्धतीने उपस्थितांसमोर मांडले. आपले साहित्य प्रकाशनयोग्य आहे की नाही याची जाणीव लेखकाला असणे आवश्यक आहे.
नवलेखकांची परिस्थिती लग्नाच्या विचाराने हुरळून गेलेल्या नववधूसारखी असते. मात्र, त्यांनी प्रकाशकाशी करावयाचे करार, अटी, व्यवहार याविषयीसुद्धा जागरूक राहायला हवे, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रात, श्याम पेठकर यांनी नवलेखकांना लेखनासंबंधी तसेच पुस्तक प्रकाशन करताना करावयाच्या आवश्यक बाबी यांसंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक तर डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी सूत्रसंचालन केले.