शिरपूर पद्धतीचे जनक सुरेश खानापूरकर यांचे मत
भीषण पाणीटंचाईतही मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. हा सामाजिक अपराध आहे. टंचाई निवारणार्थ जलसंधारण हा प्रभावी उपाय ठरू शकतो. पाणी वापराबाबत नियोजन नसल्याने दुष्काळी परिस्थिती आली. त्यामुळे पाणीटंचाई संकट हे निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे, असे प्रतिपादन शिरपूर पद्धतीचे जनक प्रा. सुरेश खानापूरकर यांनी केले. तसेच मनमाडचा पाणीप्रश्न लोकसहभागातून सोडविता येईल, असेही त्यांनी सांगितले.
मनमाड लायन्स क्लब व श्रीमती चंदाबाई कन्हैयालाल बंब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे जैन भवन येथे आयोजित ‘पाणी समस्या आणि उपाययोजना’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी लायन्सचे अध्यक्ष राजेंद्र माळी, संघपती शिवचंद ललवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. खानापूरकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात ‘शिरपूर पॅटर्न’ काय आहे याचे सचित्र वर्णन करून संपूर्ण राज्यातील पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी खानापूरकर यांनी यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जालना, आटपाडी आणि मनमाड या तीन शहरांमध्ये भयावह पाणीटंचाई जाणवली. मनमाडला अजूनही ती जाणवत आहे. याबाबत सखोल अभ्यास केला असता मनमाड परिसरात खूप पाणी आहे.
पाण्याचे योग्य नियोजन केले तर टंचाई जाणवणार नाही. ३० कोटी रुपयांत मनमाडचा पाणी प्रश्न सोडवता येईल. त्यासाठी वाघदर्डी धरणातील पूर्ण गाळ काढणे, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळ काढणे, पाणलोट क्षेत्रातील बंधाऱ्यातील गाळ काढून त्याची खोली आणि रुंदी वाढवली, या सर्व कामात गुणवत्ता साधली तर शहराचा पाणी प्रश्न सुटू शकतो, असा दावा त्यांनी केला.
मनमाडचा पाणी प्रश्न गंभीर आहे. मध्यंतरी ५० ते ५५ दिवसांनंतर नळाला पाणी आले. पाणीटंचाई महिलांनी कशी सहन केली, असा प्रश्नही त्यांनी केला. आपण वाघदर्डी धरणासह परिसरातील बंधाऱ्यांची पाहणी केली. मनमाडला पाणी सध्या दूरवरून पाणी आणले जाते आणि ते खर्चिक आहे. परंतु प्राप्त परिस्थितीत परिसरात पाणी भरपूर उपलब्ध असून ते अडविण्याची आणि जमिनीत मुरविण्याची गरज आहे. त्यासाठी बंधाऱ्याची खोली आणि रुंदी वाढविली पाहिजे. हे काम महत्त्वाकांक्षी असून यासाठी समस्त मनमाडकरांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. लायन्सचे अध्यक्ष राजेंद्र माळी यांनी प्रास्ताविक केले. अॅड. शशिकांत व्यवहारे यांनी परिचय करून दिला. हर्षद गद्रे, हेमंत ताकडे, पी. बी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
..तर मनमाडचा पाणी प्रश्न सोडविता येईल
शिरपूर पद्धतीचे जनक सुरेश खानापूरकर यांचे मत भीषण पाणीटंचाईतही मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. हा सामाजिक अपराध आहे. टंचाई निवारणार्थ जलसंधारण हा प्रभावी उपाय ठरू शकतो. पाणी वापराबाबत नियोजन नसल्याने दुष्काळी परिस्थिती आली. त्यामुळे पाणीटंचाई
First published on: 09-08-2013 at 09:39 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then the manmad water problem will get sloved