नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकच उमेदवारी अर्ज असल्याने नीलेश पटेल यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असला तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही जल्लोष न करण्याचे आवाहन नीलेश पटेल यांनी केले आहे. येवला नगराध्यक्षपदी पटेल यांचे नाव पालकमंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबर रोजीच सूचविले होते. त्यामुळेच आपला अविरोध निवडीचा मार्ग खुला झाला. छगन भुजबळ आणि शिवसेनाप्रमुखांचे स्नेहाचे संबंध होते. राजकारणात काहीही होऊ शकते मात्र, स्नेहाचे नाते अतूट असतात. भुजबळांमुळे मला प्रथम नागरिक होण्याची संधी मिळणार असली तरी भुजबळ आणि ठाकरे या दोन्ही कुटुंबाप्रती नागरिकांमध्ये स्नेह आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करु नये, असे आवाहन नीलेश पटेल यांनी केले आहे.