चार महिन्यांपूर्वी उचगाव येथून चोरून नेलेल्या तवेरा या मोटारीसह रमेश प्रकाश चौधरी (वय ३०, रा. संधेरिया, जि. पाली-राजस्थान) या चोरटय़ास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
रोहित प्रभाकर मिरजे (वय ३६ रा. उचगाव) यांचे उचगाव जकात नाक्याजवळ मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्यांची तवेरा मोटार (एम. एच. ०९-बी. बी. ९१२१) ही गॅरेजबाहेर पार्क केली होती. १४ एप्रिल रोजी रात्री या मोटारीची चोरी झाली होती. मिरजे यांनी शाहुपुरी पोलिसात मोटार चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान ही मोटार रमेश चौधरी याने चोरून नेली होती. चौधरी हा अहमदाबाद येथे ही गाडी घेऊन जात असताना गुजरात पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी तपशीलपूर्वक माहिती घेतली असता चौधरी याने कोल्हापुरात गाडी चोरल्याची कबुली दिली. गुजरात पोलिसांनी चौधरी याला शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.