ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून नवी मुंबई पालिकेने प्रस्तावित केलेले तीन उड्डाण पूल व एक व्हेईक्युलर भुयारी मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. या आठवडय़ात या कामाचे आदेश जारी केले जाणार आहेत. त्यामुळे १५३ कोटीच्या या कामांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या पुलांचा खर्च पालिकेऐवजी एमएमआरडीएने करावा यासाठी माजी पालकमंत्री गणेश नाईक हे आग्रही होते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा खर्च एमएमआरडीएला करण्याचे आदेश दिले होते. पालिका क्षेत्रात एमएमआरडीएने हे पहिले मोठे काम हाती घेतले आहे.
नवी मुंबईतून मुंबई, पुणे, गोवा, जेएनपीटीकडे येणारे-जाणारे अनेक मोठे महामार्ग जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या असाइड या योजनेअंर्तगत ठाणे-बेलापूर मार्गाचे आठ वर्षांपूर्वी सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात आले. त्यासाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून ३० कोटी रुपये खर्च करून रबाले ते महापे हा एमआयडीसीतील सेवा रस्तादेखील बांधण्यात आला आहे. तरीही गर्दीच्या वेळी ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक सुरुळीत होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पालिकेने या मार्गावर सविता केमिकल्स, तळवली, घणसोली नाका येथे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या तीन उड्डाणपुलांबरोबरच महापे येथे तीन बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीला सोयीचे व्हावे म्हणून या चौकात एक भुयारी मार्गाचे कामही यात अंर्तभूत करण्यात आले होते. या भुयारी मार्गातून दुचाकी वाहने जाऊ शकतील, असा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांवर पालिकेचा मोठा निधी खर्च होण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी हा रस्ता एमएमआरडीएने करावा, अशी गळ मुख्यमंत्र्याबरोबर सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत घातली. ती मान्य करण्यात करण्यात आल्याने सविता केमिकल्सजवळली उड्डाणपुलासाठी २४ कोटी ७८ लाख, तळवली नाका (६४.१२ कोटी), घणसोली नाका (४३.९७ कोटी) आणि महापे येथे व्हेईक्युलर भुयारी मार्गासाठी २० कोटी ४४ लाख असे १५३ कोटी ३१ लाखाचे काम एमएमआरडीएने ४ डिसेंबर रोजी काढले असून, ६ जानेवारी रोजी त्याच्या कामाचे आदेश दिले जाणार आहेत. यात कंत्राटदाराने वाढ केल्याने हे काम १५५ कोटीच्या घरात गेले आहे. हे कामही जवळच महापे एमआयडीसीत सुरू असलेल्या जे. कुमार या कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून, ठाणे-बेलापूर मार्गावर पुन्हा एकदा वाहतुकीचा ताण पडणार आहे.