मीटरमध्ये बिघाड करून वीजचोरी केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या प्रेमचंद ब्रिजलाल आहुजा या व्यापाऱ्याला अमरावती येथील जिल्हा न्यायालयाने तीन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.
अमरावती येथील रामपुरी कॅम्प, अजमेरी कॉम्प्लेक्सस्थित एस.झेड. वाघमारे यांच्या मालकीचे दुकान प्रेमचंद आहुजा यांनी भाडय़ाने घेऊन त्यामध्ये मेसर्स खानदान कलेक्शन प्रतिष्ठान सुरू केले. भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता विनोद आत्माराम धर्माळे यांनी सहाय्यक दक्षता अधिकारी सुरेश माधवराव ढवळे यांच्यासह १२ ऑगस्ट २००४ ला त्या दुकानातील विद्युत मीटरची तपासणी केली असता मीटरच्या पीव्हीसी सीलच्या वायरमध्ये अखंडता नव्हती, शिवाय मीटर बॉडीवरील लीड सीलमध्ये ढवळाढवळ आढळली. यावरून वीजचोरीचा संशय आल्याने कनिष्ठ अभियंता प्रदीप अंधारे व पंच इरफान अहमद शेख मेहबूब यांच्या समक्ष अ‍ॅक्यू चेक मीटरने तपासणी केली असता दुकानातील मीटर ५९.१८ टक्के मंदगतीने चालत होते.
 भरारी पथकाने मीटर काढून त्याची पाहणी केली असता मीटरच्या पीसीबीला जोडणाऱ्या सीटी सर्किटमध्ये रेझिस्टंट आढळले. संबंधिताने एका वर्षांत ३११७ युनिटचा वापर केल्याचे सांगत त्याला ३२ हजार ४१७ रुपयाचे देयक व दंड ठोठावण्यात आला. प्रेमचंद आहुजा यांनी देयक व दंडाचा भरणा केला नाही. अखेर विनोद धर्माळे यांनी याप्रकरणी विद्युत कायद्यान्वये दुकानमालक व विद्युत ग्राहक एस.झेड. वाघमारे आणि प्रेमचंद आहुजा विरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल केले. याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांच्या समक्ष झाली. सुनावणी दरम्यान दुकानमालकाचे निधन झाले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश शेळके यांनी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आहुजा यांना दोषी ठरवत तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.