उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघिणीच्या १५ महिन्याच्या बछडय़ाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात या बछडय़ाचा मृत्यू कुपोषणाने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गतवर्षीही याच कालावधीत या अभयारण्यात वाघाच्या एका बछडय़ाचा कुपोषणानेच मृत्यू झाल्याची चर्चा होती, हे विशेष.
काही महिन्यापूर्वीच या अभयारण्यात ‘चांदी’ या वाघिणीने चार बछडय़ांना जन्म दिला. दिवाळीच्या सुमारास या वृत्ताला दुजोरा मिळाला. मात्र, चार बछडय़ांच्या जन्माचा आनंद अभयारण्य साजरे करत असतानाच एका बछडय़ाच्या मृत्यूने या आनंदावर विरजण पडले. रविवारी, दुपारच्या सुमारास वनरक्षक गस्त घालत असताना ठाणा तलावाजवळ या बछडय़ाचा मृतदेह आढळून आला. वनरक्षकांनी त्वरीत ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी लुचे यांच्या निदर्शनास आणून दिली. सोमवारी या मृत बछडय़ाचे वनखात्याच्या डॉ. चित्रा राऊत व पशुवैद्यक अधिकारी डॉ. निरगुडकर यांनी शवविच्छेदन केले. या अहवालात बछडय़ाच्या पोटात साधे अन्नच नव्हे, तर विष्ठा देखील नव्हती. अभयारण्यातच त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे महानिरीक्षक डॉ. डी. स्वैन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मोईकोकीन अय्यर, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षकाचे प्रतिनिधी म्हणून संजय करकरे, मानद वन्यजीव रक्षक रोहीत कारू, सहाय्यक वनसंरक्षक उत्तम सावंत होते.
चांदी या वाघिणीने अलिकडेच चार बछडय़ांना जन्म दिला असला तरी मृत पावलेला बछडा हा चांदी व बलरामचा होता. त्यांना आणखी एक बछडा होता व तो गतवर्षी मृत पावला होता. मात्र, अभयारण्य प्रशासन अजूनही हे मानायला तयार नाही. नागझिरा अभयारण्यातील ‘जय’ या वाघाने गतवर्षी या अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर त्याने आपले वर्चस्व स्थापन करून बलरामला अभयारण्याबाहेर काढले. चांदी जयच्या संपर्कात आल्यानंतर गेल्या दोन-तीन महिन्यापासून तीने या मृत बछडय़ाला टाळणे सुरू केले. दिवाळीपूर्वीच तिने पुन्हा चार बछडय़ांना जन्म दिला. त्यामुळे या बछडय़ाला खाण्यास काहीही मिळाले नाही. अवघ्या १५ महिन्याचे वय असल्याने त्याला शिकार करता येणेही शक्य नव्हते. उपासाचा हा कालावधी वाढत गेल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.