मानव आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष वाढल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, वाघ उपराजधानीपासून जेमतेम २५ किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचला आहे. इतक्या जवळ अंतरावर वाघाचे अस्तित्व असल्यामुळे शहरवासियांनी स्वत:ला किती सुरक्षित समजावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जंगलात उद्भवलेल्या गंभीर संकटामुळे वन्यप्राणी, विशेषत: वाघ आणि बिबटे मानवी वस्त्यांजवळ येऊन माणसांवर हल्ले करत असल्याच्या घटना वाढीला लागल्या आहेत. वाघाच्या हल्ल्यात प्राणी बळी जाण्याची तेवढी चर्चा होत नसली, तरी माणसांचे जीव जाण्याच्या घटनांमुळे समाजात रोष निर्माण होतो. साधारणत: जंगलांना लागून असलेल्या वस्त्या आणि गावांमध्ये हे प्रकार जास्त घडतात. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ांमधील गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून मानवी बळी जाण्याचे प्रकार अधिक आहेत.
मात्र बुधवारी वर्धा मार्गानजीक घडलेल्या एका घटनेने वाघ नागपूरच्या जवळ येऊन पोहचल्याची चाहूल लागली आहे.
काल वडगाव धरण परिसरातील देवरी गुजर या गावात पट्टेदार वाघाने एका गायीला मारले. तिचे कलेवर तेथेच टाकून तो निघून गेला आणि आज आपली शिकार खाण्यासाठी तो आल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे २५ किलोमीटरवर आहे. याच वाघाने तीन महिन्यांपूर्वी वाकेश्वरजवळ एक गाय मारली होती.
वर्धा मार्गालगतच्या जुनापाणी, काळडोंगरी, वाकेश्वर या भागात वाघ असल्याचे अनेक गावकरी सांगत असतात.
मात्र कालच्या घटनेने त्याचा प्रत्यक्ष पुरावा मिळाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकरी आणि वनविभागाचे अधिकारी वाघाचा शोध घेत आहेत. वाघाने गाय मारलेली असल्यामुळे माणसांनाही त्याचा धोका असल्याने गावकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे.