राज्यातील सध्याचा दुष्काळ इतका भीषण असणार आहे, की पिण्याच्या पाण्यावरून गावोगावी संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. कदाचित एप्रिल-मे महिन्यात टँकरसोबत स्टेनगनधारी ‘एसआरपी’ पाठवावे लागतील, अशी भीती राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष व आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. बाजार समितीच्या सभागृहात ‘जलसाक्षरता काळाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, आमदार वैजनाथ शिंदे, पंचायत समिती सभापती मंगलप्रभा घाडगे, संतोष देशमुख, आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की दुष्काळी ही संधी मानून गावपातळीवर काम केले नाही तर येणारा काळ कोणालाही माफ करणार नाही. अगोदरच गावात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, दळणवळण या सुविधा योग्य नाहीत. सुरक्षितता नाही, म्हणून लोक गावातून तालुक्याकडे, तालुक्यातून जिल्हय़ाकडे व जिल्हय़ाकडून पुण्या-मुंबईकडे धाव घेत आहेत. दुष्काळाच्या वेळी गावातील स्थलांतर मोठय़ा प्रमाणात होते. पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडणाऱ्यांची संख्या मोठी असते व एकदा ते स्थलांतरित झाले तर पुन्हा हे लोक गावाकडे येतील याची शाश्वती देणे अवघड आहे. गावे सुखी करणे व सर्व सोयी उपलब्ध करणे अजिबात अवघड नाही. हिवरे बाजारमध्ये आपण या सर्व बाबी करून दाखवल्या आहेत. गावे सुधारण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीमार्फत कोणत्याही गावाला कायापालट करण्यास निधी उपलब्ध होऊ शकतो. जलसंधारणाच्या योजना राबवल्या गेल्या, गावातले पाणी गावात अडवले गेले तर त्याचा अतिशय चांगला लाभ होऊ शकतो. हिवरेबाजारमध्ये भीषण दुष्काळातही केवळ ५० फुटांवर पाणी उपलब्ध आहे. कारण हंडाभर पाणीही रस्त्यावर सांडलेले दिसले तरी घरचे नळ कनेक्शन तोडले जाते असे ते म्हणाले.

‘टँकरसोबत आता स्टेनगनधारी ठेवण्याची वेळ’