राज्यातील अनेक शाळांमध्ये केवळ चांगली स्वच्छतागृहे नसल्याने मुलींना सातवीनंतर शाळा सोडावी लागल्याचे कटू सत्य प्रगत पुरोगामी महाराष्ट्रातील आहे. काही ठिकाणी केवळ पाण्याअभावी स्वच्छतागृहे अस्वच्छ राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील शाळांचे हे विदारक चित्र बदलण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे असून ते येत्या काळात नक्कीच बदलण्यात येईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. देशावर ब्रिटिश शिक्षणपद्धत लादणाऱ्या लॉर्ड मॅकोलेची शिक्षणप्रणाली बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
मराठा मंडळ मुलुंडच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सनदी अधिकारी मधुकर झेंडे, संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के उपस्थित होते. पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेले किती विद्यार्थी दहावीपर्यंत शिक्षण घेतात याचे मध्यंतरी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात सातवीनंतर अनेक विद्यार्थी शाळा सोडून देत असल्याची बाब लक्षात आली.
अस्वच्छतागृहांमुळे पालक मुलींना शाळेत पाठविणे बंद करू लागले. त्यामुळे ग्रामीण भागात सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृह उभारण्याचे मोठे काम सरकारपुढे आहे. भारतातील शिक्षणपद्धतीची रचना करताना जन्माने भारतीय असलेल्या विद्यार्थ्यांची रुची मात्र ब्रिटिश राहील याची काळजी घेणाऱ्या मॅकोलेची शिक्षणपद्धत येत्या पाच वर्षांत बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे तावडे यांनी सांगितले. आज बुद्धय़ांकाऐवजी कुटुंब, समाज, देश यांच्याबरोबर घट्ट नाते पक्के करणाऱ्या भावनिक बुद्धय़ांकाची गरज आहे. तो नष्ट होऊ लागल्यानेच मुंबईसारख्या ठिकाणी वृद्धाश्रमांची आवश्यकता वाढू लागली आहे. विद्यमान शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना दोष न देता ही शिक्षणपद्धत राबविणारी यंत्रणा दोषी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सनदी अधिकाऱ्यामध्ये मराठी टक्का वाढण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आपला पाल्य संगणकावर बायोलॉजी पाहतोय की पोर्नलॉजी हे तपासून पाहण्यासाठी आजच्या प्रत्येक आईला संगणक प्रशिक्षण आवश्यक असून ते एक मिक्सर चालविण्याइतके सोपे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांस्कृतिक विभागाचे पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदकांना आमंत्रित करण्यापेक्षा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.