शहरातील सातपूर येथे गुरूवारी होणाऱ्या यात्रेनिमित्त तसेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्त या दोन दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे.
सातपूर येथे गुरूवारी सायंकाळी यात्रेनिमित्त बारा गाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. या कार्यक्रमासाठी नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर लोकांची एकच गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार या दिवशी दुपारी दोन ते रात्री नऊ दरम्यान राठी सिग्नल (आयटीआय सिग्नल) ते सातपूर गाव हा मार्ग दोन्ही बाजूकडून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी राठी सिग्नलकडून एमआयडीसी रोडने परफेक्ट सर्कलमार्गे तापरिया टुल्स कंपनीसमोरून महिंद्रा सर्कल या मार्गाचा उपयोग सातपूर व त्र्यंबककडे जाण्यासाठी करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात येणार असल्याने मिरवणूक मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. मिरवणूक मोठा राजवाडय़ापासून सुरू होणार असून वाकडी बारव, कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, धुमाळ पॉईंट, रविवार कारंजा, रेड क्रॉस, सांगली बँक, नेहरू गार्डन, व्यापारी बँक, देवी मंदीर शालिमार, शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी जाणार आहे. हा मार्ग त्या दिवशी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत वाहनधारकांनी दिंडोरी नाक्याहून पेठ फाटा सिग्नल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोक स्तंभ, मेहर सिग्नल, सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नल, गडकरी चौक सिग्नल मार्गे नवीन नाशिक व नाशिकरोड या मार्गाचा अवलंब करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.