डीसी-एसी परिवर्तनानंतर मध्य रेल्वेची इंधन बचत होणार असून प्रवाशांचा प्रवासही वेगवान होणार असल्याचा मध्य रेल्वेचा दावा फोल ठरत आहे. त्यातच पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश गाडय़ा डिझेल इंजिनांद्वारे चालत असल्याने मध्य रेल्वेची इंधन लूट होत आहे. विद्युतशक्तीवरील इंजिन चालवणाऱ्या लोको पायलटना डिझेल इंजिन चालवणे अवघड असल्याने या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे सारथ्य पुरेसा अनुभव नसलेल्या मालगाडी व पॅसेंजर गाडय़ा चालवणाऱ्या लोको पायलटना करावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीलाच लागला असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून समजते.
मालगाडी किंवा पॅसेंजर गाडय़ा एका ठरावीक वेगमर्यादेने चालविल्या जातात. मालगाडी चालविताना प्रवाशांच्या वाहतुकीसंबंधीची काळजी घेतली नाही तरी चालते, पॅसेंजर गाडय़ा जवळच्याच अंतरापर्यंत जात असल्याने त्यांचे थांबे व वेगमर्यादा मर्यादित स्वरूपाच्या असतात. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा वेग ताशी ८० ते १२० किमीपर्यंत पोहचू शकतो. या गाडय़ांमध्ये सिग्नल यंत्रणेबाबतच्या सूचना, विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे दिल्या जाणाऱ्या सावधानतेच्या सूचना आदींचे काटेकोरपणे पालन करावे लागते. यामुळे या गाडय़ा चालविण्यासाठी पुरेसा अनुभव असलेले लोको पायलट नेमले जातात.
मध्य रेल्वेवरील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे हा देशातील डीसी विद्युतप्रवाहावर चालू असलेला एकमेव छोटा टप्पा असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात येत होते. त्यामुळे या टप्प्याचे डीसी-एसी परिवर्तन करण्यासाठी मध्य रेल्वेने जिवाचे रान केले होते. त्यानंतर रेल्वेची वार्षिक ३०० कोटींची बचत होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही मुंबईहून पुणे आणि त्यापल्याड जाणाऱ्या अनेक गाडय़ा डिझेल इंजिने लावून चालवल्या जात आहेत. विद्युतशक्तीवर चालणाऱ्या इंजिनांच्या पायलटना डिझेल इंजिने चालवणे कठीण जाते. त्यामुळे पुण्यापुढे जाणाऱ्या या गाडय़ा साधारणपणे पॅसेंजर किंवा मालगाडय़ांच्या इंजिनांचे पायलट चालवतात. हा प्रवाशांच्या जिवाशी खेळ असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पुण्यापर्यंत एसी विद्युतप्रवाह असूनही डिझेल इंजिनाचा वापर रेल्वेच्या आर्थिक स्थितीला तडे देणारा आहे. पुण्यापर्यंत गाडी नेण्यासाठी कोणत्याही इंजिनात साधारणपणे १००० लिटर डिझेल लागले. हे डिझेल हाय स्पीड असल्याने त्याची किंमत पेट्रोलपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे रेल्वेला जादा पैसे मोजावे लागतात. तसेच डिझेलवर चालणारी इंजिने विद्युत इंजिनांपेक्षा हळू चालतात. त्यामुळे प्रवासालाही वेळ जास्त लागतो. त्याऐवजी पुण्याला डिझेल इंजिन जोडून ही गाडी पुढे नेल्यास थोडासा वेळ वाढला, तरी रेल्वेची प्रचंड बचत होणार आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. याबाबत मध्य रेल्वेच्या परिचालन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, पुण्याच्या पुढे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुण्याला इंजिन बदलण्याऐवजी मुंबईहूनच ती गाडी डिझेलवर चालवणे जास्त सुलभ असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
डिझेल इंजिनावर धावणाऱ्या महत्त्वाच्या गाडय़ा
१. मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
२. लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम
३. मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
४. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
५. मुंबई-त्रिवेंद्रम नागरकोयल एक्स्प्रेस
६. मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस
७. मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस
८. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
९. मुंबई-हैद्राबाद हुसैनसागर एक्स्प्रेस
१०. मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस