प्रखर राष्ट्राभिमान व कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत स्वामी विवेकानंद केंद्र तसेच रामकृष्ण मठ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त येथील चित्रकार स्वाती राजवाडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या ‘गॉड इन सर्च’ या पुस्तकातील विविध कवितांचा आशय लक्षात घेत रेखाटलेल्या चित्रांचे अनोखे प्रदर्शन नाशिककरांना अनुभवास मिळणार आहे.
गुरूवारी सायंकाळी पाच ते सात या कालावधीत गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुलात हे चित्र प्रदर्शन होणार आहे. स्वामी विवेकानंद सार्थ शती समारोहतर्फे काढण्यात आलेली स्वामी विवेकानंद यांची रथयात्रा गुरूवारी शंकराचार्य संकुल येथे येत आहे. या पाश्र्वभूमीवर, गुरूवारी संकुलात सायंकाळी ५ वाजता स्वामी बुध्दानंद यांचे ‘दैनंदिन जीवनात अध्यात्माचे महत्व’ या वर व्याख्यान होईल. विवेकानंद जयंती समारोह सूत्रावर आधारीत राजवाडे यांनी स्वामीजींच्या अध्यात्मिक लेखनावर आशय संपन्न अशा कवितांवर चित्रे रेखाटली आहेत. स्वामी विवेकानंदाची १२ जानेवारी ही जन्मतारीख लक्षात घेऊन त्यांनी १२ चित्रे रेखाटली. मागील सहा महिन्यांपासून ‘स्वामींचे अध्यात्मिक विचार’ या विषयावर राजवाडे यांनी काम केले. स्वामी विवेकानंद लिखीत ‘गॉड इन सर्च’चा अभ्यास केला. अनेकांशी चर्चा करून आशय समजून घेतला. अभ्यासांती त्यातील निवडक कवितांवर त्यांनी काम करण्यास सुरूवात केली.
‘अ साँग सिंग टु दी’, ‘ए टु एन्ड अर्ली व्हॉयलेट’, ‘ऑन द सी ब्लॉसम’, ‘ए हेन्स टु शिवा’, ‘पीस’, ‘अँजल अ‍ॅन्सर’ अशा १२ कवितांचा त्यात समावेश आहे. अ साँग सिंगमध्ये स्वामी विवेकानंद आपले गुरू श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी संवाद साधत आहेत. ए टु एण्डमध्ये कितीही संकट, आपत्ती आली तरी आपली कर्तव्ये करत तटस्थ वृत्तीने काम करावे, ए हेन्स टू शिवामध्ये महादेवाची स्तुती करण्यात आली आहे. कालीमातेने लोककल्याणासाठी केलेला संहार आणि त्यातून पुन्हा नाविन्यतेचा उमललेला अंकुर हे सर्व दृश्य राजवाडे यांनी आपल्या कुंचल्यातून सशक्तपणे रेखाटले आहेत. यासाठी अ‍ॅक्रेलिक माध्यमाचा वापर करण्यात आला आहे. पुढील काळात त्यांना या विषयानुरुप अजून काही चित्रे रेखाटायची आहेत.