यश कधी एका रात्रीतून मिळत नाही. त्यासाठी परिश्रमांची श्रुंखला गुंफावी लागते. याची खूणगाठ बालपणापासून मनाशी बांधलेल्या रामकिशन भंडारी यांनी वयाच्या सत्तरीतही प्रयत्नांचा पाठपुरावा सोडला नाही. यश हाच त्यांचा प्रिय सखा बनला आहे..
चाकूर तालुक्यातील आष्टा मोड या गावात मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या रामकिशन भंडारी यांची आई ते १६ वर्षांचे असतानाच देवाघरी गेली. रामकिशन यांचे जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण. गावात किराणा मालाचे छोटेसे दुकान व वडिलोपार्जित ३० एकर कोरडवाहू जमीन. आईच्या निधनामुळे वडिलांनी प्रपंचातील लक्ष कमी केल्यामुळे कुटुंबातील मोठा म्हणून रामकिशनवर प्रपंचाचा भार पडला. गावातील दुकान, शेती सांभाळत प्रपंचाचा गाडा त्यांना हाकावा लागला. घरात कुटुंबाची देखभाल करण्यासाठी म्हणून लवकर लग्न करावे लागले. आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी वैध मार्गाने पडेल ते कष्ट करण्याची रामकिशनची तयारी होती. डोक्यात सातत्याने नवनवीन व्यवसायाचे विचारचक्र घोंगावत असे.
गावाची गरज लक्षात घेऊन प्रारंभी पिठाची गिरणी सुरू केली. कापड दुकान टाकले. छोटय़ा व्यवसायातून मिळणारी मिळकतही छोटीच होती. तांत्रिक बाबतीत रामकिशनचे डोके चांगले चालायचे. त्या काळात एखादे इंजिन घेऊन ते भाडय़ाने द्यावे, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात होती. घरी एक जुने इंजिन पडून होते. ते दुरुस्त करण्यास मेकॅनिक मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबातील सदस्याने यापुढे चुकूनही इंजिन घेऊ नये, असे वडिलांच्या डायरीत लिहून ठेवलेले सापडले. रामकिशनने मात्र इंजिन विकत घेऊन ते भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्या काळात गुऱ्हाळासाठी चरख व इंजिन लागत असे. प्रारंभी इंजिन व चरख घेऊन त्यांनी भाडय़ाने दिले व हा आकडा नंतर पाचपर्यंत वाढवला. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले.
सन १९७० मध्ये विहिरीची खोली वाढवण्यासाठी राजस्थानहून आलेले ब्लास्टिंग मशिन त्यांनी पाहिले व काही दिवस हा व्यवसाय नक्की कसा केला जातो, याची माहिती घेतली. काम करणाऱ्या माणसाकडे दिवसभर किती रुपयांचे काम केले, याची चौकशी केली. १२०० रुपये हा आकडा ऐकल्यानंतर त्यांनी मशीन मालकास गाठून ३० हजार रुपयांत ती मशीनच विकत घेतली. त्यासाठी एक्सप्लोझिव्हचा परवाना लागतो, हे त्यांना माहिती नव्हते. खटाटोप करून त्यांनी तो परवाना मिळविला. १९७२चा दुष्काळ हा या व्यवसायासाठी त्यांना सुवर्णसंधी घेऊन आला. दर महिन्याला एक नवीन मशीन याप्रमाणे तब्बल १२ मशीन खरेदी करून त्यावर त्यांनी व्यवसाय चालवला. त्यानंतर पाण्याच्या शोधार्थ विंधन विहिरी घेण्याची लोकांमध्ये गरज निर्माण झाली. रामकिशन भंडारी यांनी लातूरमधील पहिले बोअरिंग मालक म्हणून कामगिरी बजावली. व्यवसाय चांगला चालल्यामुळे एकाचे पाच मशीन झाले. त्याच कालावधीत लातूरला आडत दुकानासाठी जागा घेतली व आडत दुकान सुरू केले. शहरातील आदर्श कॉलनी भागात प्लॉट घेऊन घर बांधले व १९८२ मध्ये ते लातुरात राहायला आले.
व्यवसाय कितीही केले तरी ग्रामीण भागातून आलेल्या माणसाला आपल्या गावाची नाळ सोडावी वाटत नाही. भंडारी यांनी एकत्र कुटुंबप्रमुख म्हणून मालमत्ता वाढवण्यासाठी गावात नव्याने १०० एकर जमीन टप्प्याटप्प्याने खरेदी केली. ५ हजार रुपये एकरने जमीन मिळाली होती. जमीन खरेदी केल्यानंतर जमिनीचे सपाटीकरण करणे, नाला बांधणे, विहिरी घेणे, विंधन विहिरी घेणे, असे प्रकार सुरू केले. दरम्यान, त्या शेतीतच खडी केंद्र सुरू केले. खडी केंद्राचा व्यवसायही उत्तम चालला. कालांतराने दगड काढले गेल्यामुळे जी खोल जागा तयार झाली, त्यात आपोआप पाणी पाझरून प्रचंड पाणीसाठा जमा झाला. त्यावर सुमारे ५० एकरवर त्यांचे पाणी फिरू लागले.
शेती करताना व्यापारी पद्धतीने शेती करायची, हे ध्येय मनात ठेवून पारंपरिक पिकाबरोबरच शेतीतील प्रयोगशीलता त्यांनी वाढवली. ऊस, द्राक्ष, अद्रक, हळद, शाबूदाणा, बटाटे, भाजीपाला अशा उत्पादनांवर त्यांनी भर दिला. लातूर परिसरात द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्यांच्या यादीत भंडारींचे नाव होते. १५ वर्षे लातूर जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाचे ते अध्यक्ष होते. आजही त्यांच्याकडे २० एकरांवर द्राक्ष बाग आहे. उत्पादन चांगले होऊनही मालाची साठवणूक व विक्री यात शेतकरी कमी पडतो, हे लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या मालकीचे दोन कोल्ड स्टोअरेज उभारले. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ती सुविधाही उपलब्ध करून दिली.
उसाचे उत्पादन चांगल्या प्रमाणावर घेत गुळाचा उद्योगही अखंडपणे सुरू आहे. द्राक्षाबरोबरच चिकू, डाळिंब, टरबूज यांचेही ते चांगले उत्पादन घेतात. त्यांची संपूर्ण १५० एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची काळजी घेत ठिबक, तुषार सिंचनाचा ते वापर करतात. आष्टय़ाहून लातूरला दररोज १५० लिटर दुधाची विक्री स्वत:च्या पॅकिंगमधून ते करतात. ५० रुपये लिटर दुधाचा भाव असूनही दुधासाठी लोकांची झुंबड उडते. त्यांच्या साथीला आता त्यांची व भावाची मुलेही आलेली आहेत. त्यातील काहीजण उच्चशिक्षित असल्यामुळे शेतीकडे लक्ष देऊ शकत नाहीत, पण काहीजण त्यांच्या सोबत असतात. सकाळी ६ वाजता उठलेले भंडारी रात्री ११ पर्यंत जमिनीला पाठ लावत नाहीत.
व्यवस्थापन, नियोजन साधले तरच शेतीचा व्यवसाय हा परवडू शकतो. ‘उंटावर बसून शेळ्या हाकण्यातून’ काहीच साध्य होत नाही. बांधावर आपण बसलो तरच शेतीचे प्रश्न कळतात, याची समज त्यांना असल्यामुळे त्यांचे नाते शेतीशी जोडलेले आहे. शेती हा व्यवसाय आहे याचे भान न विसरता काम केले पाहिजे. विरंगुळा म्हणून शेती करणे कधीही फायद्याचे असत नाही. केवळ भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे कसब अंगी बाणले पाहिजे यावर त्यांचा आग्रह आहे. त्यांना शहरी भाषाही उत्तम येते, पण अस्सल ग्रामीण बाज त्यांच्या भाषेत ठासून भरलेला असतो. पारंपरिक मारवाडी कुटुंबातील सदस्यांबद्दलचा प्रत्येकाच्या मनातील जो समज असतो, तो त्यांना भेटल्यावर पूर्णपणे गळून पडतो. पैसा समाजाचा असल्यामुळे सामाजिक कामाचीही त्यांना आवड असून विविध सामाजिक संस्थेत ते सक्रिय सहभागी असतात.

ते अविस्मरणीय दिवस
लहानपणी पट्टय़ापट्टय़ाची नाईटपँट २४ तास वापरावी लागे. ती धुण्यासाठी त्या काळी असलेल्या कोंबडाछाप साबणाच्या वडीचा १० पैशांचा तुकडा मिळत असे. त्या तुकडय़ाने शेतात पँट धुवून, वाळवून पुन्हा तीच अंगावर घालावी लागत असे. आज कष्टातून मिळविलेली आर्थिक सुबत्ता आली असली तरी मी पूर्वीचे ते दिवस अजून विसरलो नसल्याचे भंडारी सांगतात.