दहिसरवासीयांना विरंगुळ्यासाठी एक सुंदर उद्यान उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेने गणपत पाटील नगरसमोरील आरक्षित भूखंडावर बाग फुलवली. जवळपास चार कोटी रुपये खर्ची पडले. आता या सुंदर उद्यानात सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारता येईल, मुलांना खेळता-बागडता येईल या आशेने आसपासच्या परिसरातील नागरिक खूष झाले. मात्र आता तब्बल तीन वर्षे झाली तरी एकाही नागरिकाला उद्यानात फेरफटका मारणे तर सोडा, एक पाऊलही टाकता आलेले नाही. शेजारील झोपडपट्टीमधील रहिवासी उद्यानाची नासधूस करतील असे कारण पुढे करत पालिकेने हे उद्यान बंद ठेवले आहे. खरे म्हणजे उद्यानाच्या श्रेयाचे लोणी कोणी चाखायचे यावरून झालेल्या राजकारणामुळे हे उद्यान कडीकुलूपात बंद पडले आहे.
दहिसरच्या पश्चिमेला लिंक रोडवर एका बाजूला खारफुटीवर उभी राहिलेली ‘गणपत पाटील नगर’ नामक झोपडपट्टी आणि दुसऱ्याबाजूला एका रांगेत उभ्या असलेल्या सोसायटय़ांच्या झकपक इमारती. या परिसरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी पालिकेने गणपत पाटील नगरच्या समोर सुमारे १६ हजार चौरस मीटर भूखंडावर उद्यान फुलविण्याचा निर्णय घेतला. सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून २०१० मध्ये हे उद्यान तयार झाले. त्यानंतरही या उद्यानावर सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च झाले. मुंबईवर दहशतवादी हल्ला चढविणारा दहशतवादी अजमल कसाब याला प्राणाची बाजी लावून पकडणारे शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे यांचे नाव या उद्यानाला देण्यात आले. त्यावेळच्या काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मोठय़ा थाटामाटात उद्घाटनही केले. पण गणपत पाटील नगरमधील झोपडपट्टीवासी नासधूस करतील हे कारण पुढे करून पालिकेने हे उद्यान आजतागायत बंदच ठेवले आहे. त्यामुळे एकाही नागरिकाला या उद्यानात पाऊल टाकता आलेले नाही. गणपत पाटील नगर काँग्रेसची मतपेढी म्हणून ओळखली जात असल्यामुळे झोपडपट्टीवासीयांपासून उद्यान वाचविण्यासाठी सत्ताधारी शिवसेनाही आग्रही आहे. आता या उद्यानाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदार आणि सुरक्षिततेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. ‘उद्यान सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत खुले राहील’ असा फलक उद्यानाच्या प्रवेशद्वारात झळकविण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे उद्यान सकाळ-संध्याकाळ खुले असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. मात्र हे उद्यान बंदच आहे, असे या परिसरातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
दहिसरची आयसी कॉलनी आणि तुकाराम ओंबळे उद्यानादरम्यानचा एक मोकळा भूखंड असून तेथून उद्यानात जाण्यासाठी वाट करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र हा भूखंड पालिकेला अद्यापही ताब्यात घेता आलेला नाही. हा भूखंड लवकरच मिळेल आणि उद्यान खुले होईल, असा दावा शिवसेनेचे नेते करीत आहेत. मात्र काँग्रेसच्या मतदारांना उद्यानापासून दूर ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या शिवसेना नेत्यांनी उद्यानासाठी वाट करून देणारा हा भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे तुकाराम ओंबळे उद्यान आजही बंदच आहे. काँग्रेस-शिवसेनेमधील राजकारणाला कंटाळलेले नागरिक मात्र प्रवेशद्वारावरील कुलूप केव्हा उघडते आणि उद्यानात फेरफटका मारायला कधी मिळणार याची वाट पाहात आहेत.
झोपडपट्टीवासीयांना उद्यानात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार करुन शिवसेना आणि पालिका प्रशासनाने हे उद्यान बंदच ठेवले आहे. मग तीन कोटी रुपये खर्च करून उद्यान उभारलेच का, जनतेचा पैसा वाया घालविण्याचा अधिकार पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना कुणी दिला, असा सवाल काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे.