वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचा सुगावा लागताच वन कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून मुरमाडी येथील दोघांना अटक केली असून त्यांच्याजवळून शस्त्रांसह अन्य साहित्यही जप्त केले आहे.
 वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचा सुगावा वन कर्मचाऱ्यांना अनेक दिवसांपासून होता. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली होती. शिकार होणार असल्याचा सुगावा लागताच वनकर्मचारी आय.आर. पठाण व बीटरक्षक यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एच. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून प्राण्यांची शिकार करणाऱ्या रामचंद मेश्राम (७१) व बंडू टेकाम (४१,रा. मुरमाडी) या आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून अìथग तार, सुरी, चाकू, दोन कुऱ्हाडी, सायकल, पिवळ्या रंगाचा वायर आदी साहित्य ताब्यात घेतले.
तिरोडा तालुक्यातील नवेझरी परिसरात मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. त्याचप्रमाणे शेतात इतरही पिके असल्याने वन्यप्राण्यांचा या परिसरात वावर असतो. याच संधीचा फायदा घेऊन वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाली होती. यासाठी विजेचा वापर करण्यात आला. विजेचा प्रवाह लावून प्राण्यांची शिकार करण्याकरिता पुरवण्यात आलेली अìथग तार प्रकाश खंडाते, मुनेश्वर बागडे, बाया बागडे, प्रमिला भांडारकर या चार शेतकऱ्यांच्या शेतातून पुरविण्यात आली. त्याच रात्री प्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न होता, मात्र सायंकाळी घटनास्थळाजवळ वन कर्मचारी, बीटरक्षक, आय.आर. पठाण, एम.एस. पटले, सहाय्यक क्षेत्र अधिकारी गोंधुळे, बीटरक्षक एफ.पी. बोरकर, वन कामगार धनराज ठवकर, रमेश कुसराम, प्रल्हाद गोबाडे, दुधराम उके, राजकुमार मसरके, महादेव बिसेन, बालचंद टेकाम, राधे कावळे गस्तीवर होते. दुसऱ्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा वनक्षेत्र अधिकारी एन.एच. शेंडे व त्यांचे सहकारी कर्मचारी महेंद्र भांडारकर, अशोक हरडे, मुन्ना बागडे, नेहरू खंडाते, प्रकाश सोयाम, प्रमोद हरडे व इतर गावकऱ्यांनी व्हिडीओ चित्रीकरण करून केला.
रावणवाडीत हरीण ठार
रावणवाडी परिसरातील एक हरीण अपघातात गंभीर जखमी झाले. उपचार करण्यापूर्वीच त्या हरिणाचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास रावणवाडी येथे घडली. बालाघाट-गोंदिया मार्गावर एका अज्ञात वाहनाने या हरणाला धडक दिली होती. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरणाला वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक पठाण व बीटरक्षक दखणे यांनी उपचारासाठी गोंदिया येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले, मात्र उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत  हरीण ५ ते ६ वर्षांचे होते.