ह्रदयविकाराचा झटका आल्याने चालकाने ट्रक सरळ मोटरसायकलस्वारांच्या अंगावर चढविला असता या विचित्र अपघातात चालक शंभूदास गोस्वामी (४२) व मोटरसायकलस्वार हरीदास कंवलवार (५८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बेबी कंवलवार ही गंभीर जखमी झाली. ही दुर्देवी घटना आज सकाळी ७.३० वाजताची आहे.
सिमेंटनगरातील हरीदास कंवलवार व त्यांची पत्नी बेबी कंवलवार यवतमाळ येथे जाण्यासाठी मोटरसायकलने निघाले होते. त्याच वेळी वेकोलिच्या निलजई कोळसा खाणीतून शंभूदास गोस्वामी हा ट्रक (एम.एच.३४-एम-१२९२) घेऊन एसीसी सिमेंट कारखान्याच्या दिशेने निघाला. अध्र्या रस्त्यावर येत नाही तोच गोस्वामी याला फिट आली आणि त्यानंतर ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात गोस्वामी याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि समोरून मोटरसायकलने जाणाऱ्या कंवलवार दाम्पत्याला या ट्रकने चिरडले. याच वेळी गोस्वामी ट्रकच्या खाली पडला. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघितले असता कंवलवार व गोस्वामी यांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता, तर बेबी कंवलवार या गंभीर जखमी होत्या. त्यांना जखमी अवस्थेत श्वेता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.