संसरी गावाजवळ रेल्वेखाली उडी घेत दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. आत्महत्येमागील कारणाची स्पष्टता होऊ शकली नाही. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकरोड ते देवळाली कॅम्प भागात रेल्वेखाली एका जवानाने पत्नीसह आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ ही दुसरी घटना घडल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मयूर दिगंबर कोकाटे (१६) व कुणाल संजय जाधव (१७) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे देवळाली कॅम्प भागातील नवीन स्टेशनवाडी येथे वास्तव्यास होते. परिसरातील एका दुकानात ते एकत्र काम करायचे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ते संसरी गावाजवळ पोहोचले. या ठिकाणी मध्य रेल्वेचा नाशिक-मुंबई दरम्यानचा रेल्वेमार्ग आहे. साडेअकराच्या सुमारास विदर्भ एक्स्प्रेस मार्गस्थ होत असताना दोघांनी उडय़ा मारल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. नागरिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी धाव घेऊन संबंधितांचे मृतदेह रुग्णालयात हलविले. दोन मुलांच्या आत्महत्येविषयी वेगवेगळी चर्चा सुरू असली तरी त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही मुले ज्या ठिकाणी काम करीत होते, तिथे दुकानमालक त्यांना काही बोलल्याचे सांगितले जाते. या अस्वस्थतेतून त्यांनी हा मार्ग अवलंबिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर कोकाटे व जाधव कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यावर ठिय्या दिला. संबंधितांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधितांनी केली.