आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील क्रांति चौकात छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यानजीक बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. अशोक संतोषराव लाड (प्रियदर्शनीनगर, नागेश्वरवाडी, औरंगाबाद) व धर्मराज रामलाल शेजवळकर (भावसिंगपुरा, औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. क्रांति चौक पोलिसांनी या बाबत नोंद केली. गेल्या २५ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गट अ ते गट ड मधील फक्त ३ टक्के रिक्त जागा भरण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र, या निर्णयाचा फेरविचार करून संपूर्ण अनुशेष भरावा, संबंधित विभागाला या संदर्भात त्वरित आदेश द्यावा, या मागणीसाठी या दोघा तरुणांनी बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले व पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडला व दोघांना अटक केली.