तरुणी, महिलांबरोबर अश्लील कृत्य करणारे आरोपी जामिनावर सुटतात आणि पुन्हा त्याच मार्गाला जातात. यासाठी हे गुन्हे अजामीनपात्र करण्याची जोरदार लाट आली आहे. हे गरजेचे असले तरी सध्याच्या परिस्थितीत छेडछाड, अश्लील कृत्ये करणाऱ्या आरोपीकडून पोलीस कलम १०७ अन्वये चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेऊ शकतात. शिक्षेचाच हा एक प्रकार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. मनीषा तुळपुळे यांनी गुरुवारी येथे दिली.
स्त्री मुक्ती संघटनेचे कौटुंबिक मार्गदर्शन केंद्र डोंबिवली पूर्वेतील र. वा. फणसे ट्रस्टच्या शाळेत सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास महिलांविषयक सामाजिक कार्य करणाऱ्या भारती मोरे, ज्योती पाटकर, डॉ. शामला काळे, तिलोत्तमा थिटे, उषा मजेठिया आदी महिला उपस्थित होत्या.
विनयभंग व तत्सम गुन्हे अजामीनपात्र करण्याच्या शासन पातळीवर हालचाली सुरू आहेत. तो कायदा होईल तेव्हा होईल, पण सद्य परिस्थितीत पोलीस असे गुन्हे करणाऱ्या आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेऊ शकतात आणि त्या तरुणाने, व्यक्तीने तीच चूक पुन्हा केली तर त्याला त्याच कलमाखाली शिक्षा होऊ शकते. विनयभंग केला की आपली जामिनावर सुटका होतेच, असा एक समज झाला आहे म्हणून या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, असे अॅड. तुळपुळे यांनी सांगितले.
स्त्री मुक्ती केंद्राच्या अधिक माहितीसाठी डॉ. शामला काळे ९०२९०७४३८० यांच्याशी संपर्क साधावा.