गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या तीन सभापतींवर तीन सभापतींवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनीच आपल्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतला आहे विशेष.
५१ सदस्यांच्या असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसला बाहेर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि युवाशक्ती संघटना अशी आघाडी तयार झाली आणि अध्यक्षपदी राकाँच्या भाग्यश्री आत्राम, उपाध्यक्षपदी भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे, बांधकाम  सभापती पदी युवाराकाँच्या छाया कुंभारे, समाजकल्याण सभापतीपदी भाजपचे बाजीराव कुमरे आणि महिला बालकल्याण सभापतीपदी युवाशक्ती संघटनेच्या निरांजनी चंदेल हे सत्तारूढ झाले. या सर्वाविरुद्ध हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. हा अविश्वास प्रस्ताव सत्तारूढ राकाँ, भाजप आणि युवाशक्ती आघाडीच्याच जिल्हा परिषद सदस्यांनी आणलेला आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ सदस्य असून पक्षात गटबाजी आहे. त्यामुळे काँग्रेस व काही अपक्ष सदस्यांनी राकाँच्या काही सदस्यांना हाताशी धरून सत्तारूढ पदाधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी चालविली होती; परंतु संख्याबळ न जुळल्याने विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाचा विचार सोडून दिला. त्यामुळे आता सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनीच आपल्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतला आहे.
या  अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १८  फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविली आहे. हा प्रस्ताव बारगळल्यास सहा महिन्यांपर्यंत पुन्हा या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही.