उरणमधील मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. भररस्त्यात या गुरांनी ठाण मांडल्याने वाहतूककोंडीला निमंत्रण मिळत आहे. या मोकाट गुरांचे करायचे तरी काय, हा प्रश्न सरकारी यंत्रणेलादेखील पडला आहे. अनेकदा अवजड वाहनांच्या धडकेमुळे गुरांचा बळी जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीत वाढ झाल्याने बाजारहाटीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भररस्त्यात मोकाट गुरे बसत असल्याने यातून वाट काढायची कशी, असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. तालुक्यातील मोकाट गुरे प्रामुख्याने उरण-पनवेल रस्त्यावरील बोकडवीरा, कोटनाका, जासई आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बवरील धुतूम चिल्रे, उरण -चिरनेर मार्गावरील कोप्रोली, टाकी भोम या मार्गावर प्रामुख्याने आढळतात.