शहरातील त्रिरश्मी बौद्ध लेणी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर असून टवाळखोर व प्रेमी युगुलांचा सततचा वावर यामुळे लेण्यांचे पावित्र्य भंग होत असल्याची तक्रार अत्याचारविरोधी कृती समिती व त्रिरश्मी बौद्ध लेणी संवर्धन व संघर्ष समिती यांनी संयुक्तपणे केली आहे. समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ११ प्रेमी युगुलांविरुद्ध कारवाई केली.
बोधगया बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील त्रिरश्मी बौद्धलेणी परिसर व बौद्ध विहारामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केलेली आहे, याची पाहणी करण्यासाठी समितीचे प्रमुख कार्यकर्ते लेणी परिसरात दाखल झाले. बोधगया येथील बॉम्बस्फोटानंतर लेणी परिसर व बुद्ध विहाराला कडेकोट सुरक्षा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली नाही. बीट मार्शलचा दुचाकीवरून होणाऱ्या पहाऱ्याव्यतिरिक्त चोवीस तास सुरक्षेविषयी कोणतीही उपाययोजना येथे करण्यात आलेली नाही. पुरातत्त्व विभागाच्या वतीने पर्यटकांकडून शुल्क आकारले जाते. शासनाला त्याद्वारे महसूल मिळतो. तरीदेखील ही लेणी अत्यंत असुरक्षित असल्याचा आरोप समितीने केला आहे.
कार्यकर्त्यांना लेणी परिसरात विचित्र प्रकार पाहावयास मिळाले. पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. मपोलिसांनी १० ते १२ युगुलांना कायदेशीर समज देऊन सोडून दिले. पुरातत्त्व विभागाअंतर्गत लेण्यांची व्यवस्था असणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखांनीही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले. लेणी परिसरातील सुरक्षा वाढविण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समितीचे निमंत्रक राहुल तूपलोंेढे यांनी दिली.