सध्या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे नवे शहर म्हणून उदयास येत असलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवरील वांगणी गावाच्या नव्या पाणी योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.
जागेच्या अडचणीमुळे दोन वर्षांपासून वांगणीची पाणीयोजना रखडली होती. त्यामुळे झपाटय़ाने शहरीकरण होत असलेल्या वांगणी पंचक्रोशीत पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावत होते. सध्या अस्तित्वात असलेली पाणीयोजना १९७५ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. तेव्हा वांगणी गावाची लोकसंख्या पाच हजार होती. २०११च्या जनगणनेनुसार वांगणीची लोकसंख्या १२ हजार ६२५ होती. शहरीकरणाचे वारे जोरात वाहू लागल्याने सध्या वांगणीची लोकसंख्या १५ हजाराच्या घरात आहे. एका विकासकाने जागा दिल्याने आता पाणीयोजना मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही योजना १९ कोटी ६० लाख ७७ हजार रुपयांची असून २०३० मध्ये शहराची लोकसंख्या ३० हजार होईल, हे गृहीत धरून ती राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोकण विभाग पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांच्या पुढाकाराने उल्हास नदीमध्ये १.५० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले असून प्रतिदिन २. १३ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेतून वांगणीकरांना दरदिवशी सरासरी ७० लिटर्स पाणी मिळणार आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार या योजनेसाठी लोकवर्गणी भरावी लागणार आहे. या योजनेची निविदा लवकरच निघणार असून दोन वर्षांत योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.