‘रक्तदान श्रेष्ठदान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी व मैत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभरात ५ हजार रक्तदाते  रक्तदान करणार असून त्याचा प्रारंभ पुढील वर्षीच्या २ जानेवारीला करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पिनाक दंदे आणि संजय हरदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्तदानाचे विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या वर्षभरात ५ हजार रक्तदाते विविध शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करतील असा संकल्प रक्तपेढीने केला आहे. यासाठी शहरातील ५० सामाजिक संस्था एकत्रित येऊन काम करणार असून त्यात जास्तीत जास्त युवकांचा समावेश राहणार आहे. विविध शासकीय आणि खाजगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रक्ताची गरज आहे. समाजात थॅलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांना मोठय़ा प्रमाणात रक्ताची गरज असल्यामुळे अशांसाठी हेडगेवार रक्तपेढी काम करीत आहे.
आगामी २ जानेवारी २०१३ ला वर्धमान नगरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून त्यासाठी शैक्षणिक संस्था, छत्तीसगडी अर्बन क्रेडिट बँक, डिप्टी सिग्नल मित्र मंडळ, ताजश्री यांचे सहकार्य मिळाले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढी ही नागपुरातील सर्वात जुनी रक्तपेढी आहे. रक्तपेढीने स्थापनेपासून ३२ थॅलेसेमिया रुग्णांना दत्तक घेतले आहे. थॅलेसिमिया आणि सिकलसेल रुग्णांना नागपुरात निशुल्क आणि सुरक्षित नियमितपणे रक्तपुरवठा मिळावा यासाठी रक्तपेढी काम करीत आहे. रक्तपेढीने सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्यामुळेच वर्षभरात ४६० शिबिरातून १६ हजार रक्तदाते, स्वच्छेने रक्तदान करणारे ६ हजार रक्तदाते असे २२ हजार रक्तदाते वर्षभरात रक्तदान करतात. नागपूर व आजूबाजूच्या गावांमध्ये एकूण २६ हजार रुग्णांना रक्तपेढीतर्फे रक्तपुरवठा करण्यात येत असल्याचे हरदास यांनी सांगितले. या सामाजिक उपक्रमासाठी मोबाईल डोनर व्हॅन रक्तपेढीने तयार केली असून ‘रक्तपेढी आपल्या दारी, गाव तिथे रक्तदान’ या प्रमाणे रक्तदात्यापर्यंत ही गाडी पोहोचणार आहे. स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला संजय भेंडे, प्रमोद पेंडके, डॉ. तुंगार उपस्थित होते.