आगामी लोकसभा निवडणुका बघता केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी असलेले हेवेदावे बाजू ठेवत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी केले.
नागपूर जिल्ह्य़ा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जिल्हयातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार वासनिक बोलत होते.बैठकीला अर्थराज्य मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे उपस्थित होत्या. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या असताना विरोधी पक्षाकडून जनतेमध्ये त्याचा अप्रचार केला जात आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या निमित्ताने देशभर दौरा करीत असून जनतेचे त्यांना समर्थन मिळत आहे. कार्यकर्त्यांनी आपआपल्या जिल्ह्य़ामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविल्या पाहिजेत. काँग्रेसला गौरवाशाली इतिहास आहे. त्याग आणि बलिदान करणाऱ्यांचा आणि जनसामान्याचा पक्ष आहे. जनसामान्य लोकांसाठी पक्षाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपसातील हेवेदावे दूर ठेवत संघटीतपणे काम करून पक्षाची ध्येय धोरण घराघरात पोहचवा आणि जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असे आवाहन वासनिक यांनी केले.
या बैठकीत ग्रामीण भागात ग्राम स्तरावर समिती स्थापन करणे, बुथ प्रतिनिधीची नियुक्ती करणे, मतदान बुथ केंद्रावर दहा स्थानिक प्रतिनिधी नियुक्ती करणे, बुथ केंद्रावरील जातीनिहाय मतदाराची संख्या पडताळणे, मागील निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांचे वर्गीकरण व मंथन करणे, ग्रामपंचायत ते लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मिळालेले यश आणि अपयशाची चर्चा करून त्यात काय सुधारणा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे, पुरूष आणि महिला बचत गट, अंगनवाडी सेविका, ग्रामीण उद्योग धंदे मआणि महिलांचे गृहउद्योग  इत्यादी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून पक्ष संघटना मजबूत कशी करता येईल त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन वाासनिक यांनी केले.
जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांनी ग्रामीण भागात केलेल्या कामाचा अहवाल सादर करून लवकरच बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या नियुक्तया करणार असल्याचे सांगितले.
भिवापूर, उमरेड, कुही, कळमेश्वर, सावनेर, रामटेक आणि पारशिवनी या तालुक्यामध्ये स्वतंत्र बैठकी आयोजित केल्या जाणार असल्याचे गावंडे यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यात कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला सुरेश भोयर, मनोहर कुंभारे, मुजीब पठान, संजय मेश्राम, आबा भोगे, नंदा तिजारे, उपासराव भुते, मनोज तितरमारे, शालु हटवार आदी ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते.